नागपूर विद्यापीठाचा १११ वा दीक्षांत समारंभ दोन टप्प्यात

By निशांत वानखेडे | Published: November 29, 2023 06:20 PM2023-11-29T18:20:29+5:302023-11-29T18:21:06+5:30

राष्ट्रपतींच्या उपस्थितीत दोन पदकांचे वितरण : दुसरा समारंभाचे सेना प्रमुखांना निमंत्रण

111th convocation of TRM Nagpur University in two phases | नागपूर विद्यापीठाचा १११ वा दीक्षांत समारंभ दोन टप्प्यात

नागपूर विद्यापीठाचा १११ वा दीक्षांत समारंभ दोन टप्प्यात

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूरविद्यापीठाचा १११ वा दीक्षांत समारंभ दोन टप्प्यात होणार आहे. पहिला समारंभ येत्या २ डिसेंबर रोजी होणार असून देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या हस्ते एक डिएससी आणि दाेन पीएचडीधारकांना सुवर्ण पदकाने सन्मानित करण्यात येईल. दीक्षांतचा दुसरा टप्पा फेब्रुवारीमध्ये होण्याची व त्यात तिन्ही सेना दलाचे प्रमुख जनरल मनाेज पांडे यांना निमंत्रण दिल्याची माहिती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांनी बुधवारी दिली.

२ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १० वाजता कविवर्य सुरेश भट सभागृह, रेशिमबाग येथे राष्ट्रपतींच्या उपस्थितीत दीक्षांत समारंभ होत आहे. याप्रसंगी महाराष्ट्राचे राज्यपाल व विद्यापीठाचे कुलपती रमेश बैस तसेच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय परिवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांची उपस्थिती राहणार आहे. याशिवाय या समारंभाला विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेचे सदस्य तसेच सर्व विद्याशाखांचे सन्माननीय अधिष्ठाता उपस्थित राहणार आहेत. या दीक्षांत समारंभात विज्ञान व तंत्रज्ञान विद्या शाखेतून डि.एससी. पदवी प्राप्त करणारे डॉ. रामचंद्र हरीसा तुपकरी आणि डॉ. टि. व्ही. गेडाम सुवर्णपदक आचार्य पदवी प्राप्त विद्यार्थिनी राजश्री ज्योतीदास रामटेके हिला राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान केले जाणार आहे.

नागपूर विद्यापीठाच्या १०० व्या दीक्षांत समारंभाला तत्कालिन राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दूल कलात उपस्थित राहिले हाेते व विद्यापीठाला १०० वर्षे पूर्ण झाल्यानंतर शतकीय दीक्षांत समारंभाला पुन्हा राष्ट्रपती उपस्थित राहणार आहेत, ही बाब उल्लेखनीय आहे. पत्रकार परिषदेला प्र-कुलगुरु डॉ. संजय दुधे, कुलसचिव डॉ. राजू हिवसे, परीक्षा व मूल्यमापन मंडळ संचालक डॉ. प्रफुल्ल साबळे, वित्त व लेखा अधिकारी हरीश पालीवाल उपस्थित होते.

७९ हजार विद्यार्थ्यांना पदवीदान

विद्यापीठाच्या दुसऱ्या टप्प्यातील समारंभ पुढच्या वर्षी फेब्रुवारी २०२४ मध्ये होणार आहे व यात तिन्ही सेना दलांचे प्रमुख जनरल मनोज पांडे उपस्थित राहतील, असा विश्वास कुलगुरू डॉ. चौधरी यांनी दिला. यावेळी हिवाळी २०२२ व उन्हाळी २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या ७९,४४७ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान केली जाणार आहे. यामध्ये विद्याशाखा निहाय संख्या : विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे २९,६४१, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे १९८४३, मानव विज्ञान विद्याशाखेचे १९३१२, आंतरविद्याशाखीय अभ्यास विद्याशाखेचे ३९५१, स्वायत्त महाविद्यालये ६४००, पदविका प्रमाणपत्र ३०० विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

१२९ आचार्य पदवीधारक

विद्यापीठाअंतर्गत शिक्षक व संशोधक विद्यार्थी संशोधनाचे कार्य करतात. या दीक्षांत समारंभात विद्या शाखा निहाय १२९ संशोधकांना आचार्य पदवी देऊन सन्मानित करण्यात येईल. यात विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेत ६०, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेत २१, मानवविज्ञान विद्याशाखेत ३६, आंतर विद्याशाखीय अभ्यास विद्याशाखेत १३ आदींचा समावेश आहे.

Web Title: 111th convocation of TRM Nagpur University in two phases

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.