सीआरपीएफ अधिकारी असल्याची बतावणी, काँग्रेस पदाधिकाऱ्याला १.१२ लाखांचा गंडा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2023 02:10 PM2023-08-09T14:10:14+5:302023-08-09T14:11:25+5:30
गिट्टीखदानच्या माजी एपीआयच्या बनावट आयडीचा वापर : घरगुती वस्तू विकण्याच्या नावाखाली फसवणूक
नागपूर : सीआरपीएफ अधिकारी असल्याची बतावणी करत एका आरोपीने शहरातील काँग्रेस पदाधिकाऱ्याची १ लाख १२ हजार रुपयांची फसवणूक केली. शहर काँग्रेस अल्पसंख्याक सेलचे पश्चिम नागपूर अध्यक्ष रिझवान खान रुमवी असे पीडित पदाधिकाऱ्याचे नाव असून, ते गिट्टीखदान येथील रहिवासी आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुदर्शन गायकवाड हे गिट्टीखदान पोलिस ठाण्यात एपीआय पदावर कार्यरत होते. सहा महिन्यांपूर्वी त्यांची मुंबईला बदली झाली. गायकवाड यांचे रिझवान रुमवीसोबत चांगले संबंध होते. मंगळवारी दुपारी बाराच्या सुमारास गायकवाड यांच्या नावाने तयार केलेल्या फेसबुक आयडीवरून रिझवान यांना मेसेज आला. जवळचा मित्र सीआरपीएफमध्ये असून त्याची नागपुरातून बदली झाली आहे. त्यामुळे तो कमी किमतीत घरातील सामान विकत असल्याचे त्यात नमूद होते. आरोपीने बनावट आयडीवरूनच टीव्ही, सोफा, फ्रीज, दुचाकी, वॉशिंग मशीन, लॅपटॉप आदींचे फोटो पाठविले व केवळ १.१२ लाखात या गोष्टी मिळतील, असा दावा केला.
गायकवाड यांच्याशी मैत्री असल्याने रिझवान यांना शंका आली नाही व त्यांनी गुगल पेवर मनोज शाहू नावाच्या आयडीवर १.१२ लाख रुपये ट्रान्सफर केले. यानंतर समोरील व्यक्तीने गायकवाड यांच्या बनावट आयडीच्या माध्यमातून परत संपर्क केला व परत पैशांची मागणी केली. यावरून रिझवान यांना संशय आला व त्यांनी गायकवाड यांना फोन लावला. त्यावेळी आयडी बनावट असल्याची बाब समोर आली. त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. सायबर पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.