नागपूर मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यासाठी ११,२१६ कोटी ;मुख्यमंत्र्यांची मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2019 08:36 PM2019-01-01T20:36:39+5:302019-01-01T20:38:11+5:30

आर्थिक बळकटी आणि लोकांना सुलभ वाहतूक सुविधा प्रदान करणाऱ्या महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉपोर्रेशनच्या नागपूर मेट्रो प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी मंजुरी दिली. ११,२१६ कोटी रुपयांच्या ४८.३ कि़मी.चा प्रकल्प वर्ष २०२४ पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.

11,216 crore for second phase of Nagpur Metro; Chief Minister approves | नागपूर मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यासाठी ११,२१६ कोटी ;मुख्यमंत्र्यांची मंजुरी

नागपूर मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यासाठी ११,२१६ कोटी ;मुख्यमंत्र्यांची मंजुरी

Next
ठळक मुद्देविस्तार बुटीबोरी, कन्हान, हिंगणा एमआयडीसी, आसोलीपर्यंत

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आर्थिक बळकटी आणि लोकांना सुलभ वाहतूक सुविधा प्रदान करणाऱ्या महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉपोर्रेशनच्या नागपूर मेट्रो प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी मंजुरी दिली. ११,२१६ कोटी रुपयांच्या ४८.३ कि़मी.चा प्रकल्प वर्ष २०२४ पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.
मंत्रालयात झालेल्या बैठकीत महामेट्रोतर्फे नागपूर मेट्रो टप्पा-२ चे सादरीकरण करण्यात आले. यावेळी ऊर्जामंत्री आणि नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खा. कृपाल तुमाने, आ. सुधीर पारवे उपस्थित होते. मंजूर अहवाल केंद्राच्या शहरी विकास मंत्रालयाकडे पाठविण्यात येणार असून त्यावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर लवकरच बांधकामाला सुरुवात होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
राज्य व केंद्राचा प्रत्येकी २० टक्के वाटा, ६० टक्के विदेशी संस्थांकडून कर्ज
दुसऱ्या टप्प्यात नागपूर शहराचा मध्यभाग व उपनगर जोडले जाणार आहे. ११,२१६ कोटींच्या गुंतवणुकीत राज्य आणि केंद्र शासनाचा प्रत्येकी २० टक्के वाटा अणि उर्वरित ६० टक्के रक्कम विदेशी आर्थिक संस्थांकडून कर्जस्वरुपात घेण्यात येणार आहे. नागपूर मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यामुळे २०२४ पर्यंत प्रवासी वाहतूक क्षमता दरदिवशी २.९ लाखांवर जाणार आहे. टप्पा-१ आणि टप्पा-२ मुळे दरदिवशी एकूण संख्या ५.५ लाखांवर जाण्याची अपेक्षा आहे. बहुतांश बांधकाम एलिव्हेटेड राहील. ज्या मार्गावर उड्डाण पूल येईल, त्याठिकाणी डबलडेकर पूल बनविण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात ७५ टक्के काम पूर्ण झाली असून जवळपास ४ हजार कोटी खर्च झाले आहेत.
३ फेब्रुवारी २०१८ ला दुसऱ्या टप्प्यासाठी बैठक
नागपूर मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याच्या बांधकामासंदर्भात ३ फेब्रुवारी २०१८ ला रामदासपेठेतील हॉटेल सेंटर पॉर्इंट येथे बैठक झाली होती. त्यावेळी खा. अजय संचेती, खा. कृपाल तुमाने, आ. सुधाकर देशमुख, आ. समीर मेघे, महापौर नंदा जिचकार, जिल्हा परिषद अध्यक्षा निशा सावरकर, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. बृजेश दीक्षित, प्रकल्प संचालक महेश कुमार, रोलिंग स्टॉक संचालक सुनील माथुर, महाव्यवस्थापक (प्रशासन) अनिल कोकाटे, बुटीबोरी मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनचे अध्यक्ष नितीन लोणकर, वेदचे अध्यक्ष देवेंद्र पारेख, विविध भागांचे सरपंच आणि नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी राईट्सचे समूह महाव्यवस्थापक पीयूष कन्सल यांनी सादरीकरणाच्या माध्यमातून दुसऱ्या टप्प्याच्या डीपीआरची माहिती दिली होती. त्यावेळी डीपीआर तयार करण्यासाठी सूचना मागविण्यात आल्या होता. लोकप्रतिनिधींच्या सूचनांचा डीपीआरमध्ये समावेश करण्यात आला आहे.
नागपूर मेट्रो टप्पा-२ ची वैशिष्ट्ये

  •  नागपूर मेट्रोचा दुसरा टप्पा ४८.३ कि़मी. आणि ३५ स्टेशनचा समावेश
  •  मेट्रो रिच-१ : खापरी ते बुटीबोरी एमआयडीसी इंडोरामा कॉलनी (१८.७ कि.मी.), जामठा परिसर, डोंगरगाव, मोहगाव, बुटीबोरी, म्हाडा कॉलनी, इंडोरामा कॉलनी स्टेशन.
  •  मेट्रो रिच-२ - ऑटोमोटिव्ह चौक ते कन्हान नदी (१३ कि.मी.), लांबीच्या मार्गावर १३ स्टेशन आणि खसारा, लेखानगर, कामठी, ड्रॅगन पॅलेस, कन्हान नदी, कन्हान स्टेशन.
  •  मेट्रो रिच-३ : लोकमान्यनगर ते हिंगणा (६.६ कि.मी.), रायसोनी कॉलेज परिसर, एमआयडीसी क्षेत्र, आॅर्डिनन्स फॅक्टरी कॉलनी, वाडी, अमरावती रोड. वासुदेवनगर ते वाडी (४.५ कि.मी.), नीलडोह, गजानननगर, राजीवनगर, लक्ष्मीनगर, रायपूर, हिंगणा गांव, एमआयडीसी स्टेशन.
  •  मेट्रो रिच-४ : पारडी ते ट्रान्सपोर्टनगर (५.५ कि.मी.), अंबेनगर, कापसी, ट्रान्सपोर्टनगर, आसोली स्टेशन.

नवीन वर्षात चांगली सुरुवात
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर मेट्रो प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याला मंजुरी दिली ही नवीन वर्षाची चांगली सुरुवात आहे. प्रक्रियेचे सर्व सोपस्कार पार पडल्यानंतर दुसऱ्या टप्प्याच्या कामालाही सुरुवात होईल.
डॉ. बृजेश दीक्षित, व्यवस्थापकीय संचालक,
महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन.

 

 

Web Title: 11,216 crore for second phase of Nagpur Metro; Chief Minister approves

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.