भूखंड विक्रीचा सौदा करून ११.२५ लाख हडपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2019 10:31 PM2019-05-28T22:31:26+5:302019-05-28T22:33:06+5:30

बनावट कागदपत्रे दाखवून दुसऱ्याच्या मालकीचे भूखंड आपले आहे, अशी थाप मारत एका दाम्पत्याने अनेकांकडून लाखोंची रक्कम हडपली. तब्बल नऊ वर्षे होऊनही त्यांनी भूखंडाची विक्री करून दिली नाही म्हणून रक्कम देणाऱ्यांचा रोष उफाळून आला. त्यांनी आरोपींविरुद्ध सोमवारी जरीपटका ठाण्यात तक्रार नोंदविली. सुधीर केशवराव जांभूळकर (वय ५०) आणि भारती सुधीर जांभूळकर, अशी आरोपींची नावे आहेत. ते बेझनबागमध्ये राहतात.

11.25 lakhs grabbed by selling a plot | भूखंड विक्रीचा सौदा करून ११.२५ लाख हडपले

भूखंड विक्रीचा सौदा करून ११.२५ लाख हडपले

Next
ठळक मुद्देनागपुरात अनेकांची फसवणूक : नऊ वर्षांनंतर गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बनावट कागदपत्रे दाखवून दुसऱ्याच्या मालकीचे भूखंड आपले आहे, अशी थाप मारत एका दाम्पत्याने अनेकांकडून लाखोंची रक्कम हडपली. तब्बल नऊ वर्षे होऊनही त्यांनी भूखंडाची विक्री करून दिली नाही म्हणून रक्कम देणाऱ्यांचा रोष उफाळून आला. त्यांनी आरोपींविरुद्ध सोमवारी जरीपटका ठाण्यात तक्रार नोंदविली. सुधीर केशवराव जांभूळकर (वय ५०) आणि भारती सुधीर जांभूळकर, अशी आरोपींची नावे आहेत. ते बेझनबागमध्ये राहतात.
जांभूळकर दाम्पत्याने २०१० मध्ये खोब्रागडे चौकात भारती डेव्हलपर्स नावाने कार्यालय सुरू केले होते. तेथे भूखंड खरेदीसाठी येणाऱ्या व्यक्तींना जांभूळकर दाम्पत्य बनावट कागदपत्रे आणि दुसऱ्याच्याच मालकीची जमीन दाखवत होते. त्याच्या थापेबाजीत येऊन २७ मे २०१० ला अतुल लक्ष्मणराव क्षीरसागर तसेच त्यांच्या नातेवाईकांनी जांभूळकर दाम्पत्याने दाखविलेले भूखंड खरेदी केले. त्यासाठी आरोपींना त्यांनी ११ लाख २४ हजार रुपये दिले. ही रक्कम घेतल्यानंतर विविध कारणे सांगून जांभूळकर दाम्पत्याने क्षीरसागर तसेच त्यांच्या नातेवाईकांना भूखंडाची विक्री करून देण्यास टाळाटाळ केली. नऊ वर्षे होऊनही आरोपींनी भूखंडाची विक्री करून दिली नाही म्हणून क्षीरसागर तसेच त्यांच्या नातेवाईकांना संशय आला. त्यांनी नमूद जागेच्या मालकीहक्काची कागदपत्रे तपासली असता, आरोपी जांभूळकर दाम्पत्याचा त्या जमिनीसोबत कसलाही संबंध नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे क्षीरसागर यांनी जरीपटका ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. आरोपी जांभूळकर दाम्पत्याची चौकशी केली जात आहे.
बनावट बयाणापत्र दिले
आरोपींच्या मालकीची जमीन नसूनदेखील जांभूळकर पती-पत्नीने स्वत:च्या मालकीची जमीन असल्याचे सांगून ही जमीन अनेकांना भूखंडाच्या रूपाने विकली. त्यांनी प्रत्येकाला बनावट बयाणापत्रही तयार करून दिले होते. विशेष म्हणजे, क्षीरसागर यांनी २७ मे २०१० ला भूखंडाच्या खरेदीचा सौदा करून आरोपींना रक्कम दिली होती आणि बरोबर नऊ वर्षांनी सोमवारी २७ मे २०१९ ला जांभूळकर दाम्पत्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला.
फसवणूक करणारा पोलीस अन् फसगत झालेलाही पोलीस
जरीपटका पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी सुधीर जांभूळकर हा पोलीस खात्यात नोकरी करीत होता. त्याने दहा वर्षांपूर्वी पत्नीच्या नावाने प्रॉपर्टी डिलिंगचा व्यवसाय सुरू केला. तर, तीन वर्षांपूर्वी त्याने स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि प्रॉपर्टी डिलिंगच्या नावाखाली बनवाबनवीचा गोरखधंदा जोमात सुरू केला. पोलीस खात्यात असल्यामुळे त्याला कारवाईची भीती नव्हती. तोच उलट पैसे देणारांना धमकावत होता. मात्र, या प्रकरणात अुतल क्षीरसागर नामक फिर्यादी पोलीस हवलदार कोतवालीच्या एसीपी कार्यालयात कार्यरत असल्याने जांभूळकर व त्याच्या पत्नीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला.

 

 

Web Title: 11.25 lakhs grabbed by selling a plot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.