११४ बंडखोरांना काँग्रेसचा दणका
By admin | Published: February 11, 2017 02:20 AM2017-02-11T02:20:13+5:302017-02-11T02:20:13+5:30
भाजपने बंडखोरांवर कारवाईचा बडगा उगारताच शुक्रवारी काँग्रेसलाही जाग आली. महापालिकेच्या निवडणुकीत बंडखोरी करीत पक्षाच्या
सहा वर्षांसाठी निलंबित : कार्यसमितीच्या बैठकीत निर्णय
नागपूर : भाजपने बंडखोरांवर कारवाईचा बडगा उगारताच शुक्रवारी काँग्रेसलाही जाग आली. महापालिकेच्या निवडणुकीत बंडखोरी करीत पक्षाच्या अधिकृत उमेदवाराविरोधात अपक्ष किंवा इतर पक्षाकडून निवडणूक लढविणाऱ्या तब्बल ११४ जणांची काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आली. संबंधितांना सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आले. यामुळे आता काँग्रेसच्या प्रचारातील अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे.
काँग्रेसच्या उमेदवारीसाठी इच्छुक उमेदवारांनी जिल्हा निवड समितीकडे अर्ज सादर केले होते. मुलाखतीच्या वेळी इच्छुकांनी उमेदवारी न मिळाल्यास बंडखोरी न करता पक्षाच्या अधिकृत उमेदवाराचा प्रचार करू, अशी प्रतिज्ञा समितीसमोर केली होती. मात्र, यातील काहींनी उमेदवारी न मिळाल्याने बंडखोरी करीत अपक्ष किंवा मिळेल त्या पक्षाचा उमेदवार बनून रिंगणात उडी घेतली आहे. या शिस्तभंगाची पक्षातर्फे गंभीर दखल घेण्यात आली असून प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्या आदेशानुसार संबंधितांचे काँग्रेस पक्षाचे प्राथमिक सदस्यत्व रद्द करण्याचा व सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
३८ पैकी एकूण ३६ प्रभागात बंडखोरी झाली आहे. फक्त शहर अध्यक्ष विकास ठाकरे लढत असलेल्या प्रभाग ३७ व नगरसेवक प्रफुल्ल गुडधे लढत असलेल्या प्रभाग ३८ मध्येच बंडखोरांनी दंड थोपटलेले नाहीत. काँग्रेसने बंडखोरांची प्रभागनिहाय यादी जारी केली आहे. निलंबित करण्यात आलेल्यांमध्ये महिनाभरापूर्वी काँग्रेसमध्ये दाखल झालेले माजी महापौर किशोर डोरले, नगरसेवक महेंद्र बोरकर, अरुण डवरे, कुमुदिनी कैकाडे, दीपक कापसे, हिरा गेडाम, तुषार नंदागवळी, जनार्दन मून, कल्पना गोस्वामी, मीनाक्षी ठाकरे, मोरेश्वर मौदेकर, चेतन तरारे, उषा खरबीकर, ममता गेडाम, कुसुम घाटे, सोनिया कपूर सिंग, सुनीता कळंबे, उर्मिला ठाकूर, सुरज ढोणे, अंजना मडावी, राजेश जरगर, प्रदीप अग्रवाल, जगदीश खरे, रमेश पुंड, श्रीकांत ढोलके, उषा लोखंडे, विजय पखाले, भारती पडोळे, विद्या लोणारे, चंदा बेलेकर, मोहम्मद इब्राहीम, सुभाष खोडे, सुमन अग्ने, कविता हिंगणकर, निर्मला घाडगे, गौतम कांबळे, दिलीप काळबांडे आदींचा समावेश आहे. (प्रतिनिधी)