नागपुरात तीन महिन्यात बलात्कार आणि विनयभंगाच्या ११४ घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 10:09 AM2018-04-20T10:09:40+5:302018-04-20T10:10:01+5:30
घरातील चार भिंती असू द्या किंवा शाळेतील अंगण, मुली कुठेच सुरक्षित नाहीत. त्यांना प्रत्येक ठिकाणी लक्ष्य केले जात आहे. लहानमोठे आमिष दाखवून त्यांच्यावर अत्याचार होत आहेत. दर दिवशी असे प्रकार समोर येत असून या घटना मानवतेला काळिमा फासणाऱ्या ठरत आहेत.
जगदीश जोशी।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : घरातील चार भिंती असू द्या किंवा शाळेतील अंगण, मुली कुठेच सुरक्षित नाहीत. त्यांना प्रत्येक ठिकाणी लक्ष्य केले जात आहे. लहानमोठे आमिष दाखवून त्यांच्यावर अत्याचार होत आहेत. दर दिवशी असे प्रकार समोर येत असून या घटना मानवतेला काळिमा फासणाऱ्या ठरत आहेत. मागील तीन महिन्यात दाखल झालेल्या प्रकरणांचाच विचार केला तर ही धक्कादायक बाब उघडकीस येते. गेल्या तीन महिन्यात (जानेवारी ते मार्च ) दरम्यान बलात्कार आणि विनयभंगाच्या ११४ घटना घडल्या. यात बलात्काराच्या २८ व विनयभंगाच्या ८६ घटनांचा समावेश आहे. दोन्ही प्रकरणात अल्पवयीन मुलींचा समावेश मोठ्या प्रमाणावर आहे. वडीलच करायचे अत्याचार
गिट्टीखदान पोलीस ठाणे परिसरात एका १३ वर्षाच्या मुलीवर तिचे वडील घरातच पाशवी अत्याचार करीत होते. तीन वर्षांपासून हा प्रकार सुरू होता. तिच्या मैत्रिणी आणि शिक्षकांच्या जागरुकतेमुळे हा प्रकार उघडकीस आला. पीडित मुलीच्या आईने आरोपी पतीला पोलिसांच्या स्वाधीन केले.
चौकात फिरत असतात गुन्हेगार
सीताबर्डीतील वर्दळीचा परिसर असलेल्या झाशी राणी चौकात बालाघाट येथील एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करून गुन्हेगारांनी तिचा गँगरेप केला होता. १६ मार्च रोजी तरुणी हिंगणा येथील आपल्या भावाला भेटण्यासाठी बालाघाट येथून आली होती. हिंगण्याच्या बसमध्ये बसण्यासाठी ती झाशी राणी चौकात उभी होती. दरम्यान हुडकेश्वर परिसरातील गुंड मो. शोएब मो. साबीर आणि मो. इब्राहीम अन्सारी यांची तिच्यावर नजर गेली. तिच्या भावाला आपण ओळखत असल्याचे सांगून तिला कामठी रोडवरील उप्पलवाडीत घेऊन गेले आणि तिचावर पाशवी अत्यचार केला. यानंतर तिला रेल्वे ट्रॅकवर फेकून तिचा खून करण्याचा प्रयत्न केला. परंतु पीडित मुलगी आपला जीव वाचवून नग्न अवस्थेतच पळाली. शेजाऱ्यांची तिच्यावर नजर गेल्याने तिचा जीव वाचला.
शाळाही नाही सुरक्षित
मानेवाडा येथील १६ वर्षीय दहावीच्या विद्यार्थिनीचा शाळेतच विनयभंग करण्यात आला होता. २३ फेब्रुवारी रोजी शाळेचा शेवटचा दिवस होता. बोर्ड परीक्षेचे प्रवेश पत्र घेण्यासाठी ती शाळेत आली होती. सकाळी ११ वाजता शाळेच्या पायऱ्या चढत असताना एका ३० ते ३२ वर्षाच्या युवकाने तिच्याशी बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. आरडाओरड केल्याने तो पळून गेला. आरोपी शाळेच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला. परंतु दोन महिने होऊनही तो पोलिसांच्या हाती लागलेला नाही.
त्या मुलीला बसला मानसिक धक्का
तीन वर्षापर्यंत घरामध्येच वडिलांचा अत्याचार सहन करीत असलेल्या मुलीला प्रचंड मानसिक धक्का बसला आहे. आता एखादा पुरुष जवळ येताच ती हिंसक होते. शाळेतही मित्रमैत्रिणी जवळ आल्यावर तिला राग येतो. शहरातील प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञाकडे तिचा उपचार सुरू आहे.
त्रस्त होऊन तरुणीने केली आत्महत्या
१७ वर्षाच्या तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून २३ वर्षीय कैलाश धकाते याने लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध प्रस्थापित केले. एका मंदिरात लग्न करून तो तरुणीसोबत राहू लागला. लग्नाच्या आठवडाभरातच त्याने तिला अमानवीय त्रास देऊन तिच्या आईवडिलांकडे सोडून दिले. तरुणीने त्रासाला कंटाळून १८ जानेवारी रोजी गळफास घेतला.