नागपूर विभागात ‘लेट’ रेल्वेगाड्यांमुळे ११.४७ कोटींची तिकिटे रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2019 10:20 PM2019-01-05T22:20:25+5:302019-01-05T22:21:26+5:30
दाट धुके पडल्यामुळे आणि रेल्वे रुळाच्या देखभालीच्या कामासाठी ब्लॉक घेण्यात आल्यामुळे डिसेंबर महिन्यात रेल्वेगाड्या विलंबाने धावल्या. त्यामुळे मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात ११ कोटी ४७ लाखाची तिकिटे प्रवाशांनी रद्द केली आहेत. यात नागपूर रेल्वेस्थानकावर ९ कोटी १४ लाख रुपयांची तिकिटे रद्द करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दाट धुके पडल्यामुळे आणि रेल्वे रुळाच्या देखभालीच्या कामासाठी ब्लॉक घेण्यात आल्यामुळे डिसेंबर महिन्यात रेल्वेगाड्या विलंबाने धावल्या. त्यामुळे मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात ११ कोटी ४७ लाखाची तिकिटे प्रवाशांनी रद्द केली आहेत. यात नागपूर रेल्वेस्थानकावर ९ कोटी १४ लाख रुपयांची तिकिटे रद्द करण्यात आली.
दिल्लीसह उत्तर भारतात कडाक्याच्या थंडीमुळे आणि धुके पडल्यामुळे डिसेंबर महिन्यात रेल्वेगाड्या आपल्या नियोजित वेळेपेक्षा उशिराने धावल्या. उत्तर भारतातून येणाऱ्या अनेक रेल्वेगाड्या उशिराने आल्या तर थर्ड लाईनच्या कामामुळे ब्लॉक घेण्यात येत असल्यामुळे मुंबई-हावडाकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्यांना ठिकठिकाणी थांबविण्यात आल्यामुळे बहुतांश रेल्वेगाड्यांना विलंब झाला. अशा स्थितीत उशिराने येणाऱ्या रेल्वेगाड्यांची वाट पाहण्यापेक्षा अनेक प्रवाशांनी आपले तिकीटच रद्द करून दुसऱ्या रेल्वेगाडीने जाण्याचा विचार करून आपले तिकीट रद्द केले. डिसेंबर महिन्यात नागपूर विभागात १ लाख ५१ हजार ८२६ प्रवाशांनी आपले तिकीट रद्द केले. रेल्वेने त्यांना ११ कोटी ४२ लाख ७४ हजार ३४२ रुपये परत केले. यातील १ लाख १३ हजार ५८६ प्रवाशांनी नागपूर रेल्वेस्थानकावर आपले तिकीट रद्द केले. रेल्वे प्रशासनाला त्यांना ९ कोटी १४ लाख ५२ हजार ८२० रुपये परत करावे लागले. नोव्हेंबर महिन्यातही दिवाळीमुळे रेल्वेगाड्यात प्रवाशांची मोठी गर्दी होती. त्यामुळे नागपूर विभागात १२.४५ कोटी रुपयांची तिकिटे रद्द करण्यात आली. नोव्हेंबर महिन्यात नागपूर रेल्वेस्थानकावर ९ कोटी ७७ लाख रुपयांची तिकिटे रद्द करण्यात आली.