जन्मजात व्यंग घेऊन जन्माला आली ११७ बालके; ‘डाउन सिंड्रोम’ची सर्वाधिक बालके नागपुरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2022 07:00 AM2022-03-26T07:00:00+5:302022-03-26T07:00:02+5:30

Nagpur News कोरोनाचा दुसऱ्या आणि तिसऱ्या लाटेत पूर्व विदर्भात या आजाराची ११७ बालके जन्माला आली. तज्ज्ञाच्या मते, हा प्रतिबंध करणारा आजार असतानाही जनजागृती व सोयींअभावी या आजाराची बालके जन्माला येणे गंभीर आहे.

117 babies born with congenital malformations; Nagpur has the highest number of children with Down Syndrome | जन्मजात व्यंग घेऊन जन्माला आली ११७ बालके; ‘डाउन सिंड्रोम’ची सर्वाधिक बालके नागपुरात

जन्मजात व्यंग घेऊन जन्माला आली ११७ बालके; ‘डाउन सिंड्रोम’ची सर्वाधिक बालके नागपुरात

googlenewsNext
ठळक मुद्दे नोंद न झालेल्या बालकांची संख्या अधिक

सुमेध वाघमारे

नागपूर : ‘डाउन सिंड्रोम’ हा जन्मजात किंवा गर्भधारणेच्या काळापासून बालकांमध्ये होणारा आजार. मुले जन्मत:च शारीरिक व्यंग घेऊन जन्माला येतात. कोरोनाचा दुसऱ्या आणि तिसऱ्या लाटेत पूर्व विदर्भात या आजाराची ११७ बालके जन्माला आली. तज्ज्ञाच्या मते, हा प्रतिबंध करणारा आजार असतानाही जनजागृती व सोयींअभावी या आजाराची बालके जन्माला येणे गंभीर आहे.

डाउन सिंड्रोम असलेल्यांमध्ये बौद्धिक आणि जन्मजात व्यंग दिसून येतात. बौद्धिक पातळीत काहींमध्ये कमी तर काहींमध्ये जास्त व्यंग असतात. याशिवाय हृदयविकाराची समस्या, पाचनक्रियेशी संंबंधित तक्रारी, काहींमध्ये ऐकण्यात आणि पाहण्यात कमतरता, रक्ताच्या कर्करोगाचा धोका तसेच थायरॉड ग्रंथीच्या समस्याही असतात. भारतात जन्माला येणाऱ्या ८०० मुलांमध्ये या आजाराचे एक मूल जन्माला येते. फिजिओथेरपी व डेव्हलपमेंट थेरपीने या आजाराने पीडित मुले चांगले आयुष्य जगू शकतात. परंतु आजाराचे वेळीच निदान होत नसल्याने आजाराची गुंतागुंत वाढत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

- नागपुरात ३३ तर, गडचिरोलीत ६ रुग्ण

उपसंचालक आरोग्य विभागाने उपलब्ध करून दिलेल्या माहितीनुसार, पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यांत १ एप्रिल २०२१ ते २० मार्च २०२२ या दरम्यान ‘डाउन सिंड्रोम’ची ११७ बालके जन्माला आली. यात एकट्या नागपूर जिल्ह्यात ३३ बालकांची नोंद झाली. त्याखालोखाल चंद्रपूर जिल्ह्यात २६, भंडारा जिल्ह्यात २१, वर्धा जिल्ह्यात १७, गोंदिया जिल्ह्यात १४ तर गडचिरोली जिल्ह्यात ६ बालके जन्माला आली आहेत. परंतु हा आकडा फारच कमी असल्याचे तज्ज्ञ म्हणतात.

- महाराष्ट्रात दरवर्षी २५०० वर बालकांचा जन्म

डाउन सिंड्रोम केअर असोसिएशन, इंडियाचे अध्यक्ष आणि नाशिकच्या जेनेटिक हेल्थ अँड रिसर्च सेंटरचे संचालक डॉ. ज्ञानदेव चोपडे यांनी ‘लोकमत’ला सांगितले, “जनजागृती व सोयींअभावी महाराष्ट्रात दरवर्षी ‘डाउन सिंड्रोम’ची सुमारे २५०० वर बालके जन्माला येतात. हा प्रतिबंध करणारा आजार असतानाही ही संख्या धक्कादायक आहे. या आजाराबाबत सामान्य नागरिकच नव्हे, तर अनेक डॉक्टरांनाही याची विशेष माहिती नाही. यामुळे प्रत्येक वैद्यकीय अधिकाऱ्यांना याबाबत प्रशिक्षित करणे, लक्षणे असलेल्या बाळाचे निदान करण्याची सोय उभी करणे व त्याला चांगले आयुष्य जगता यावे यासाठी यंत्रणा उभी करणे गरजेचे आहे.

- ३५ वर्षांवरील गर्भवती मातांची तपासणी आवश्यक

ज्येष्ठ बालरोगतज्ज्ञ डॉ. सतीश देवपुजारी म्हणाले, ३५ व त्यावरील वय असलेल्या प्रत्येक गर्भवती मातेची योग्य पद्धतीने व स्वस्त दरात तपासणी होणे आवश्यक आहे. असे केल्यास या आजराला रोखणे शक्य आहे.

 

 

Web Title: 117 babies born with congenital malformations; Nagpur has the highest number of children with Down Syndrome

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य