फर्निचरच्या नामांकित कंपनीला तीन अधिकाऱ्यांनीच घातला १.१९ कोटींचा गंडा

By योगेश पांडे | Published: April 28, 2024 08:15 PM2024-04-28T20:15:04+5:302024-04-28T20:15:23+5:30

कंत्राटदारांना दिली वर्क ऑर्डरपेक्षा जास्त रक्कम, तेथून स्वत:च्या खात्यात केली वळती

1.19 crores was stolen by three officials to a famous furniture company | फर्निचरच्या नामांकित कंपनीला तीन अधिकाऱ्यांनीच घातला १.१९ कोटींचा गंडा

फर्निचरच्या नामांकित कंपनीला तीन अधिकाऱ्यांनीच घातला १.१९ कोटींचा गंडा

नागपूर : ‘स्पेसवूड’ या कंपनीतील तीन अधिकाऱ्यांनीच वर्क ऑर्डरपेक्षा जास्त रक्कम कंत्राटदारांना देत १.१९ कोटींचा गंडा घातला. त्यांनी कंत्राटदारांकडून अतिरिक्त रक्कम स्वत:च्या खात्यात वळती करून घेतली. यासंदर्भात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कंपनीचे मालक विवेक देशपांडे यांनी यासंदर्भात तक्रार दाखल केली आहे. संस्थात्मक विक्री विभाग प्रमुख विनय निळकंठ घरोटे (शिवाजीनगर), श्रीकांत विनायकराव बोंद्रे (अविघ्न अपार्टमेंट, पावनभूमी) व विक्रांत विनायकराव कापसे (४१, हिवरी ले आऊट) अशी आरोपींची नावे आहेत. बोंद्रेकडे कंपनीच्या कंत्राटदारांची वर्क ऑर्डर बनविणे, बिले जारी करण्याची जबाबदारी होती. विक्रांत हा मॅनेजर होता व त्याच्याकडे फर्निचरच्या इन्स्टॉलेशन साईटवर देखरेख करण्याचे काम होते. तर विनय घरोटे संस्थात्मक प्रकल्पांचा एकूणच व्यवसाय पाहत असल्याने खर्च मंजूर करण्यासोबतच एकूण व्यवसायाची पॉवर ऑफ अटॉर्नी देण्यात आली होती. २०२२-२३ च्या लेखापरीक्षात संस्थात्मक प्रकल्पांमध्ये वर्क ऑर्डरपेक्षा जास्त रक्कम आकारल्याची बाब समोर आली. २०१८ पासून ते २०२३ पर्यंतच्या सर्व प्रकल्पांच्या बिलांची तपासणी करण्यात आली असता कंत्राटदारांना फर्निचर इस्टॉलेशनव्यतिरिक्त अतिरिक्त रक्कम आकारल्याची बाब समोर आली. ही रक्कम लोडिंग, अनलोडिंग, शिफ्टिंग, हॉल्टिंग अशा विविध नावाखाली आकारण्यात आली होती. तिघांनीही वर्क ऑर्डर व्यतिरिक्त अतिरिक्त बिलाचे पैसे कंपनीकडून मंजूर केले व कंत्राटदारांच्या खात्यावरून ती अतिरिक्त रक्कम स्वत:च्या खात्यावर वळती केली. यातून हा घोटाळा समोर आला. प्रकाश कदम, मेसर्स लावण्या एंटरप्रायझेस, मेसर्स फर्निचर स्टुडिओ, ओम एंटरप्रायझेस, डिझाईन ॲंड सर्व्हिस सोल्युूशन्स यांच्या बॅंक खात्यातून घरोटे, बोंद्रे, कापसे यांच्यासोबत त्यांच्या पत्नींच्या बॅंक खात्यात १.१९ कोटींची रक्कम वळती झाल्याची बाब उघडकीस आली. देशपांडे यांच्या तक्रारीवरून तिनही आरोपीविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 

Web Title: 1.19 crores was stolen by three officials to a famous furniture company

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :nagpurनागपूर