नागपुरात ११ वीची विद्यार्थिनी पॉझिटिव्ह; इतर विद्यार्थ्यांचीही केली जाणार तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2021 10:07 PM2021-12-18T22:07:55+5:302021-12-18T22:08:22+5:30
Nagpur News शुक्रवारी दहावीच्या विद्यार्थिनाीला, तर आज शनिवारी अकरावीच्या विद्यार्थिनीलाही कोरोनाची लागण झाल्याने चिंता वाढली आहे.
नागपूर : शुक्रवारी दहावीच्या विद्यार्थिनाीला, तर आज शनिवारी अकरावीच्या विद्यार्थिनीलाही कोरोनाची लागण झाल्याने चिंता वाढली आहे. दाभा येथील एका नामांकित शाळेतील ही विद्यार्थिनी आहे. तिच्या संपर्कात आलेल्या विद्यार्थ्यांचीही तपासणी केली जाणार आहे.
कोरोना नियंत्रणात येताच प्रथम ग्रामीणमध्ये, नंतर शहरात टप्प्याटप्प्याने शाळा-महाविद्यालये सुरू करण्यात आली. पावणे दोन वर्षाच्या कालवधीनंतर १५ डिसेंबरपासून शहरात पहिली ते सातव्या वर्गापर्यंतच्या शाळा सुरू झाल्या. यामुळे विद्यार्थ्यांसोबतच शाळांमध्ये उत्साह दिसून येत होता. परंतु शुक्रवारी १५ वर्षाची विद्यार्थिनी, तर आज १६ वर्षाची विद्यार्थिनी पॉझिटिव्ह आल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.
प्राप्त माहितीनुसार, या विद्यार्थिनीला मागील आठवड्यात सर्दी, खोकला व तापाची लक्षणे होती. परंतु या आठवड्यात कुठलेही लक्षणे नव्हती. तिला कुटुंबासह बाहेरगावी जायचे असल्याने शुक्रवारी तिने आरटीपीसीआर चाचणी केली त्याचा अहवाल आज पॉझिटिव्ह आला. विशेष म्हणजे, आज तिने शाळेत परीक्षा दिली. यामुळे तिच्या संपर्कात आलेले विद्यार्थी, शिक्षक व कर्मचाऱ्यांची आरटीपीसीआर चाचणी केली जाणार असल्याची माहिती मनपाच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली. या विद्यार्थिनीला लक्षणे नसलेतरी मनपा आयुक्तांच्या निर्देशानुसार तिला एका खासगी रुग्णालयात भरती केल्याची माहिती आहे.
-आठवड्याभरात निम्म्याने रुग्णसंख्येत घट
शनिवारी नागपूर जिल्ह्यात ३,६८४ तपासण्या झाल्या. यातून केवळ शहरातील १ रुग्ण पॉझिटिव्ह आला. दोन महिन्यांनंतर पहिल्यांदाच ही रुग्णसंख्या दिसून आली. विशेष म्हणजे, ५ ते ११ डिसेंबर या कालावधीत नागपूर जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या ६७ झाली असताना १२ ते १८ डिसेंबर या आठवड्यात रुग्णसंख्येत निम्म्याने घट होऊन ३३ वर आली आहे. सध्या कोरोनाचे ४६ रुग्ण सक्रिय आहेत.
: