कोरोनामुळे १२ दिवसांच्या बाळाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:06 AM2021-07-05T04:06:43+5:302021-07-05T04:06:43+5:30
नागपूर : कोरोनाची दुसरी लाट ओसरली असताना व मागील काही दिवसांपासून मृत्यूंची नोंद शून्यावर आली असताना शुक्रवारी कोरोना पॉझिटिव्ह ...
नागपूर : कोरोनाची दुसरी लाट ओसरली असताना व मागील काही दिवसांपासून मृत्यूंची नोंद शून्यावर आली असताना शुक्रवारी कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या १२ दिवसांच्या बाळाच्या मृत्यूने खळबळ उडाली. सर्वात कमी वयाच्या बाळाच्या मृत्यूची नागपुरातील ही पहिलीच घटना आहे. डॉक्टरांनुसार बाळाचे कमी वजन, कोरोनाची लागण, जन्मत:च हृदयाचा आजार व मेंदूज्वर असल्याने मृत्यू झाला.
सिवनी येथील एक महिला आपल्या पहिल्या प्रसूतीसाठी मेडिकलमध्ये २० जून रोजी भरती झाली. ती आठव्या महिन्यात कोरोना पॉझिटिव्ह असली तरी प्रसूतीच्यावेळी तिचा अहवाल निगेटिव्ह होता. प्रसूतीदरम्यान सिझर करण्यात आले. डॉक्टरांनुसार, जन्मत: बाळाचे वजन फार कमी होते. यामुळे ‘एनआयसीयू’मध्ये उपचारासाठी ठेवण्यात आले होते. पाचव्या दिवशी बाळाला ताप आल्याने व तो कमी होत नसल्याने आरटीपीसीआर टेस्ट करण्यात आली. २६ जून रोजी बाळाला कोरोनाचा संसर्ग असल्याचे निदान झाले. बाळाला श्वास घेण्यास अडचण होत असल्याने त्याचा ‘इको’ करण्यात आला. यात हृदयाचे छिद्र असल्याचे दिसून आले. याच दरम्यान त्याला मेंदूज्वराचा आजार झाल्याने २ जुलै रोजी त्याचा मृत्यू झाला. या पूर्वी ऑगस्ट २०२० मध्ये १६ दिवसांच्या बाळाचा मेडिकलमध्येच कोरोनामुळे मृत्यू झाला होता. यालासुद्धा कोरोनासोबतच हृदय व मेंदूचा विकार होता.