कोरोनामुळे १२ दिवसांच्या बाळाचा नागपुरात मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 10:42 AM2021-07-05T10:42:52+5:302021-07-05T10:43:21+5:30
Nagpur News कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या १२ दिवसांच्या बाळाच्या मृत्यूने नागपुरात खळबळ उडाली आहे. इतक्या कमी वयाच्या बाळाच्या मृत्यूची नागपुरातील ही पहिलीच घटना आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शुक्रवारी कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या १२ दिवसांच्या बाळाच्या मृत्यूने नागपुरात खळबळ उडाली आहे. इतक्या कमी वयाच्या बाळाच्या मृत्यूची नागपुरातील ही पहिलीच घटना आहे. डॉक्टरांनुसार बाळाचे कमी वजन, कोरोनाची लागण, जन्मत:च हृदयाचा आजार व मेंदूज्वर असल्याने त्याचा मृत्यू झाला.
सिवनी येथील एक महिला पहिल्या प्रसूतीसाठी मेडिकलमध्ये २० जून रोजी भरती झाली. ती आठव्या महिन्यात कोरोना पॉझिटिव्ह असली तरी प्रसूतीच्यावेळी तिचा अहवाल निगेटिव्ह होता. तिचे सिझर करण्यात आले. डॉक्टरांनुसार, जन्मत: बाळाचे वजन फार कमी होते. यामुळे ‘एनआयसीयू’मध्ये ठेवण्यात आले. पाचव्या दिवशी बाळाला ताप आल्याने व तो कमी होत नसल्याने आरटीपीसीआर टेस्ट करण्यात आली.
२६ जून रोजी बाळाला कोरोना संसर्ग झाल्याचे निदान झाले. बाळाला श्वास घेण्यास अडचण होत असल्याने त्याचा ‘इको’ करण्यात आला. यात हृदयाला छिद्र असल्याचे दिसून आले. याच दरम्यान त्याला मेंदूज्वर झाल्याने २ जुलै रोजी त्याचा मृत्यू झाला. यापूर्वी ऑगस्ट २०२० मध्ये १६ दिवसांच्या बाळाचा मेडिकलमध्येच कोरोनामुळे मृत्यू झाला होता. त्यालासुद्धा कोरोनासोबतच हृदय व मेंदूविकार होता.