नो टेन्शन; ग्रामीण भागात विद्यार्थ्यांच्या मदतीला गुरुजींची कॉपी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2022 02:52 PM2022-03-10T14:52:01+5:302022-03-10T14:57:02+5:30
होम सेंटर असले तरी ग्रामीण भागात तालुकास्तरावरील परीक्षा केंद्रावर परीक्षा शिस्तीत सुरू असल्याचे ‘लोकमत’च्या पाहणीत दिसून आले. मात्र तालुक्यापासून लांब अंतरावरच्या परीक्षा केंद्रांवर गुरुजी विद्यार्थ्यांच्या मदतीला धावून आल्याचे दिसून आले.
कुही/काटोल (नागपूर) : बारावीच्या परीक्षा सुरू झाल्या आहेत. कोरोनाचा धोका आणि एसटी कर्मचाऱ्यांचा संप लक्षात घेत विद्यार्थ्यांना त्यांचेच कॉलेज परीक्षा केंद्र देण्यात आले आहे. होम सेंटर असले तरी ग्रामीण भागात तालुकास्तरावरील परीक्षा केंद्रावर परीक्षा शिस्तीत सुरू असल्याचे ‘लोकमत’च्या पाहणीत दिसून आले. मात्र तालुक्यापासून लांब अंतरावरच्या परीक्षा केंद्रांवर गुरुजी विद्यार्थ्यांच्या मदतीला धावून आल्याचे दिसून आले. मात्र गुरुजी विद्यार्थ्यांना ही मदत अधिक दक्ष राहून करीत आहे. परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांशिवाय कुणालाही प्रवेश नसल्याने गेटवर शिपाई शांतता ठेवा, बारावीची परीक्षा सुरू असल्याचे सांगताना दिसून आले.
कुही तालुक्यात ७ परीक्षा केंद्र आहे. बुधवारी वाणिज्य शाखेचा वाणिज्य संघटन व व्यवस्थापन या विषयाचा पेपर होता. विद्यार्थी शांततेत व सुरळीत पेपर सोडविताना दिसले. त्यातही गुरुजींकडून विद्यार्थ्यांना वस्तुनिष्ठ प्रश्नांची उत्तरे सांगणे व कॉपी करू देणे हा प्रकार चुपके चुपके सुरू असल्याचे जाणवत होते. कुही तालुक्यात १८०१ विद्यार्थी बारावीची परीक्षा देत आहेत. बुधवारी वाणिज्य शाखेचा वाणिज्य संघटन व व्यवस्थापन (ओ.सी.) या विषयाचा पेपर होता. यात चार केंद्रांवरून ९५ परीक्षार्थी परीक्षेला बसलेले होते. त्यापैकी पचखेडी येथील केंद्रावरील एक विद्यार्थी अनुपस्थित होता. एकूण ९४ परीक्षार्थी उपस्थित होते.
कुही येथील ग्रामविकास विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे ३७ परीक्षार्थी परीक्षा देत होते. दरम्यान कुहीचे तहसीलदार शरद कांबळे यांनी परीक्षा केंद्राला भेट देऊन केंद्रांची पाहणी केली. यावेळी विद्यार्थी शांततेत पेपर सोडविताना दिसून आले. पचखेडी येथील मुकुंदराज स्वामी कनिष्ठ महाविद्यालय येथे दोन खोल्यांमध्ये ३३ विद्यार्थी परीक्षा देत होते. येथेही कुठलाही अनुचित प्रकार आढळून आलेला नाही.
मांढळ येथील एज्युनेक्स्ट कॉन्व्हेंटमध्ये १९ तर पी.पी. तिजारे कनिष्ठ महाविद्यालय येथे ६ विद्यार्थी परीक्षेला बसलेली होती. विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था शासनाच्या नियमाप्रमाणे झिकझॅक पद्धतीने प्रत्येक परीक्षा केंद्रावर केल्याचे दिसून आले. यावेळी बाहेरील नागरिकांचा कुठलाच त्रास परीक्षा केंद्रावर दिसून आलेला नाही. मात्र शिक्षकांच्या मदतीने विद्यार्थी कॉपी करीत असल्याचा भास जाणवत होता.
इयत्ता १२ वीचे तीन पेपर झालेले आहेत. यात एकही विद्यार्थी गैरप्रकार करताना आढळून आलेला नाही. परीक्षा केंद्रावर आम्ही स्वतः भेट देऊन पाहणी करतो. परीक्षा सुरळीत व शांततेत सुरू आहेत.
शारदा किनारकर, गटशिक्षणाधिकारी