कृषिपंपासाठी १२ तास सौर वीज देणार
By admin | Published: June 11, 2017 02:17 AM2017-06-11T02:17:44+5:302017-06-11T02:17:44+5:30
राज्यातील शेतकरी नापिकीमुळे होरपळला जात असताना तसेच कर्जमाफीसाठी संपाचे आयुध वापरत असताना
चंद्रशेखर बावनकुळे : ९०० शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र सौर ऊर्जा फिडर
लोकमत न्यूज नेटवर्क
कोराडी : राज्यातील शेतकरी नापिकीमुळे होरपळला जात असताना तसेच कर्जमाफीसाठी संपाचे आयुध वापरत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शेतकऱ्यांना त्यांच्या आर्थिक विवंचनेतून मुक्त करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. यासाठी ऊर्जा विभागाच्यावतीने विविध योजना जाहीर केल्या आहेत. त्याअंतर्गत कृषिपंपांना सकाळी ६ ते सायंकाळी ६ या १२ तासांच्या काळात सौर वीज देण्याचा शासनाचा संकल्प असून, त्यासाठी ८०० ते ९०० शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र सौर ऊर्जा फिडर तयार करण्यात येणार आहे, अशी माहिती ऊर्जा तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
कोराडी येथे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते ३३/११ के व्ही क्षमतेच्या उपकेंद्राचे लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्ष निशा सावरकर, पंचायत समिती सभापती अनिता चिकटे, नगराध्यक्ष सीमा जयस्वाल, नगर पंचायत उपाध्यक्ष राजेश रंगारी, पंचायत समिती उपसभापती देवेंद्र गवते, मदन राजूरकर, श्रावण बागडे, सरपंच अर्चना मैंद, उपसरपंच अर्चना दिवाणे, राम तोडवाल, रेखा मानकर, सुरेश गावंडे, प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत, अनिल निधान, मुख्य अभियंता रफीक शेख, अनंत देवतारे, संजय मैंद, अरविंद खोबे, संजय जयस्वाल, विठ्ठल निमोणे, अरुण कुळकर्णी उपस्थित होते.
बावनकुळे म्हणाले, शेतीला पूर्णवेळ वीज मिळाल्यास उत्पन्नवाढीसाठी मदत होईल. त्यामुळे शासनाने राज्यातील तीन लाख शेतकऱ्यांना कृषिपंपासाठी नवीन कनेक्शन दिले. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांना तीन रुपये प्रति युनिटप्रमाणे वीज उपलब्ध करून देणार आहे. यासाठी ४० लाख शेतकऱ्यांना सोलर पंप देण्याचे नियोजन करण्यात आले असून, चार लाखांचा मोटरपंप शेतकऱ्यांना २५ हजार रुपयांमध्ये देण्यात येणार आहे. यासाठी ३.७५ लाख रुपयांचे अनुदान शासनाच्यावतीने दिले जाईल. पाणीपुरवठा योजना सौर ऊर्जेवर चालविण्यासाठी ग्रामपंचायतींना प्रोत्साहन दिले जाईल. महावितरणच्या माध्यमातून राज्यात १३ हजार कोटींची कामे केली जात असल्याचे त्यांनी सांगितले. या निधीतून कोराडी, महादुला, कामठी, मौदा येथे भूमिगत वीज यंत्रणेची कामे केली जाणार असून, यातील ४० ते ५० टक्के कामे पूर्णत्वास आली आहेत. कोराडी तलाव विकासांतर्गत २०० कोटींची कामे केली जाणार असून, महादुला येथील महानिर्मितीच्या १४ हेक्टर जागेवर घरे बांधण्यात येणार असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.
कामठी - मौद्यात एक हजार सौरपंप
कामठी व मौदा तालुक्यातील शेतकऱ्यांना एक हजार सौर पंप देण्यात येणार असून, यासाठी १० एकरपेक्षा कमी शेती असलेल्या गरजू शेतकऱ्यांनी त्यांची नावे नोंदविण्याचे आवाहन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. ऊर्जा खात्याने राज्यात सुधारणा करायला सुरुवात केली आहे. यात नागपूर जिल्ह्याला विशेष प्राधान्य दिले जात असल्याने १६०० कोटींची कामे वीज क्षेत्रात सुरू आहे. जिल्ह्यात मागेल त्या शेतकऱ्याना महिनाभरात नवीन कनेक्शन दिले जात आहे. दोन वर्षांत नागपूर जिल्ह्यात २४ तास वीज उपलब्ध करून देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.