आंतरराज्यीय बसेसमुळे दररोज एसटीला १२ लाखाचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:07 AM2021-03-06T04:07:54+5:302021-03-06T04:07:54+5:30
आकांक्षा कनोजिया नागपूर : कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे त्याचा परिणाम एसटीच्या आंतरराज्यीय बसेसवर झाला आहे. एसटीच्या नागपूर विभागाने ...
आकांक्षा कनोजिया
नागपूर : कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे त्याचा परिणाम एसटीच्या आंतरराज्यीय बसेसवर झाला आहे. एसटीच्या नागपूर विभागाने आंतरराज्यात जाणाऱ्या बसेसची संख्या कमी केली आहे. त्यामुळे नागपूर विभागाला दररोज १२ लाखाचा फटका बसत असल्याची धक्कादायक माहिती आहे.
कोरोनामुळे एसटीच्या आंतरराज्यीय बसेस बंद करण्यात आल्या होत्या. अनलॉकनंतर आंतरराज्यीय बसेस सुरू करण्यात आल्या. परंतु पुन्हा कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे त्याचा परिणाम आंतरराज्यीय बसेसवर झाला. नागपुरातून मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि आंध्र प्रदेशात मोठ्या प्रमाणात प्रवासी जातात. कोरोनामुळे प्रवाशांची संख्या कमी झाल्यामुळे एसटी महामंडळाला दररोज १२ लाखाचे नुकसान होत आहे. सध्या छत्तीसगड राज्यातील रायपूर आणि राजनांदगाव येथे एसटीच्या आंतरराज्यीय फेऱ्या सुरू आहेत. तसेच तेलंगणा राज्यात हैदराबाद आणि आदिलाबाद येथे बसेस जात आहेत. परंतु मध्य प्रदेशातील छिंदवाडा आणि पचमढी येथील बसेस कोरोनामुळे बंद करण्यात आल्या आहेत. एकट्या मध्य प्रदेशातील ८ बसेस बंद असल्यामुळे विभागाला ६० हजाराचा फटका बसत आहे. पूर्वी आंतरराज्यात जाणाऱ्या बसेस दररोज १.४० लाख किलोमीटर धावत होत्या. परंतु कोरोनामुळे प्रवाशांची संख्या कमी झाल्यामुळे बसेसची संख्या कमी करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला. त्यामुळे सध्या आंतरराज्यात जाणाऱ्या बसेस १ लाख किलोमीटर धावत आहेत. आंतरराज्यात जाणाऱ्या बसेसच्या माध्यमातून पूर्वी विभागाला दररोज ४२ लाखाचे उत्पन्न मिळायचे. परंतु आता हे उत्पन्न ३० लाखावर आले आहे. दररोज विभागाला १२ लाखाचा फटका बसत असल्यामुळे, विभागाने ४० हजार किलोमीटर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे प्रवाशांची असुविधा होत असून, एसटीचेही नुकसान होत असल्याची स्थिती आहे.
...............
मध्य प्रदेशच्या सीमेवर कोरोना तपासणी नाही
मध्य प्रदेश सरकारच्या वतीने जाहीर केलेल्या नियमानुसार काही दिवसापूर्वी नागपूरवरून जाणाऱ्या प्रवाशांची कोरोना चाचणी करणे अनिवार्य होते. परंतु आता मध्य प्रदेशात जाणाऱ्या एसटी बसेस बंद करण्यात आल्या आहेत. सध्या खासगी वाहने मध्य प्रदेशात जात आहेत. खासगी वाहनांनी मध्य प्रदेशात जाणाऱ्या प्रवाशांनी सांगितले की, आता कोरोनाची तपासणी मध्य प्रदेशाच्या सीमेवर करणे बंद झाले आहे. केवळ थर्मामीटरच्या माध्यमातून प्रवाशांची तपासणी सुरू आहे.
विदर्भातील १२० बसेस बंद
विदर्भात एकूण ४०० बसेस धावतात. परंतु कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे सध्या २८० बसेस धावत आहेत. १२० बसेस बंद करण्यात आल्या आहेत. कोरोनामुळे प्रवाशांची संख्या कमी झाली आहे.’
- नीलेश बेलसरे, विभाग नियंत्रक, नागपूर विभाग
...............