१२ लाखांची निकृष्ट सुपारी जप्त
By admin | Published: April 14, 2017 03:03 AM2017-04-14T03:03:52+5:302017-04-14T03:03:52+5:30
अन्न व औषध प्रशासन विभागाने धडक मोहिमेंतर्गत बुधवारी तीन प्रतिष्ठानांवर कारवाई करून एकूण ९७३१ किलो निकृष्ट दर्जाच्या
अन्न व औषधी प्रशासन विभाग : तीन प्रतिष्ठानांवर कारवाई
नागपूर : अन्न व औषध प्रशासन विभागाने धडक मोहिमेंतर्गत बुधवारी तीन प्रतिष्ठानांवर कारवाई करून एकूण ९७३१ किलो निकृष्ट दर्जाच्या सुपारीचा सुमारे १२ लाख रुपये किमतीचा साठा जप्त केला आहे.
अन्न सुरक्षा अधिकारी मनोज तिवारी, आनंद महाजन व प्रवीण उमप यांच्या पथकाने अक्कीनो ट्रेडर्स, जुना कामठी रोड या प्रतिष्ठानची तपासणी करून निकृष्ट दर्जाच्या संशयावरून विक्रीसाठी साठविलेली १९४८ किलो वजनाची ३ लाख ७० हजार रुपये किमतीची सुपारी जप्त केली. अन्य कारवाईत अन्न सुरक्षा अधिकारी किरण गेडाम व सीमा सुरकर यांच्या पथकाने भोपाळ-इंदोर रोड लाईन्स, ट्रान्सपोर्टनगर, भंडारा रोड या पेढीची तपासणी करून ३५८ किलो वजनाची ९४ हजार रुपये किमतीची निष्कृष्ट सुपारी जप्त केली.
याशिवाय अन्न सुरक्षा अधिकारी अभय देशपांडे आणि शीतल देशपांडे यांच्या पथकाने मिरची बाजार चौक, इतवारी येथील रहीम गोडावूनची तपासणी केली. या कारवाईत ९४३ किलो वजनाची ५ लाख ४५ हजार रुपये किमतीची प्रतिबंधित सुगंधित सुपारी आणि ३४८८ किलो वजनाची ७ लाख ३४ हजार रुपये किमतीची निष्कृष्ट व सडलेली सुपारी जप्त केली. या जागेत प्रतिबंधित अन्नपदार्थांची साठवणूक होत असल्याचे निदर्शनास आल्याने गोडावून पुढील तपासणीसाठी सील करण्यात आले. तिन्ही कारवाईत सदर साठ्यातून विश्लेषणाकरिता नमुने घेण्यात आले.
ही कारवाई अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहआयुक्त (अन्न) शशिकांत केकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नागपूर कार्यालयातील सहायक आयुक्त मिलिंद देशपांडे व मोतीराम पवार यांच्या नेतृत्वात करण्यात आली.
जनआरोग्याचा विचार करता या प्रकारची धडक मोहीम यापुढेही सुरू राहणार आहे. गुटखा, पानमसाला, सुगंधित व स्वादिष्ट तंबाखू, सुगंधित व स्वादिष्ट सुपारी व खर्रा इत्यादी प्रतिबंधित पदार्थांचे उत्पादन, वितरण, साठवण आणि विक्री होत असल्याचे आढळून आल्यास नागरिकांनी अन्न व औषध प्रशासन विभागाला माहिती द्यावी. जनतेने व विशेषत: युवा वर्गाने अशा अन्नपदार्थांचे सेवन करू नये, असे आवाहन शशिकांत केकरे यांनी केले आहे. (प्रतिनिधी)