‘वर्क फ्रॉम होम’च्या नावाखाली महिला बँक लिपिकाला १२ लाखांचा गंडा
By योगेश पांडे | Published: May 19, 2023 06:20 PM2023-05-19T18:20:32+5:302023-05-19T18:20:54+5:30
Nagpur News ‘वर्क फ्रॉम होम’च्या नावाखाली सायबर गुन्हेगारांनी एका महिला बँक लिपिकाला १२ लाखांहून अधिक रकमेचा गंडा घातला. अशाप्रकारचे गुन्हे शहरात सातत्याने वाढत असून काही पैशांच्या आमिषापोटी लोक स्वकष्टाची कमाई काही दिवसांत गमवत असल्याचे चित्र आहे.
योगेश पांडे
नागपूर : ‘वर्क फ्रॉम होम’च्या नावाखाली सायबर गुन्हेगारांनी एका महिला बँक लिपिकाला १२ लाखांहून अधिक रकमेचा गंडा घातला. अशाप्रकारचे गुन्हे शहरात सातत्याने वाढत असून काही पैशांच्या आमिषापोटी लोक स्वकष्टाची कमाई काही दिवसांत गमवत असल्याचे चित्र आहे.
कल्याणी शरद लाकडे (महाल) असे संबंधित महिला लिपीकाचे नाव आहे. १६ एप्रिल रोजी त्यांना टेलिग्रामवर सायरा खान नामक महिलेचा मॅसेज आला व त्यात वर्क फ्रॉम होमबाबत विचारणा केली. कल्याणी यांनी त्यात रस दाखविल्याने समोरील महिलेने त्यांना विस्तृत माहिती देणारा मॅसेज पाठविला. महिलेच्या सांगण्यावरून तिने पाठविलेल्या लिंकवर कल्याणी यांनी नोंदणी केली व त्यांना ११ हजार रुपये रेफरल बोनस मिळाला. समोरील महिलेने पाठविलेले टास्क पूर्ण केल्यावर त्यांच्या बँक खात्यात सुमारे १५ हजार रुपये जमा झाले. त्यामुळे त्यांचा विश्वास वाढला.
त्यानंतर समोरील महिला त्यांना विविध टास्क देत गेली व वेगवेगळ्या नावाखाली पैसेदेखील घेत गेली. कल्याणी यांना तिच्यावर विश्वास बसला व त्या फूड रेटिंग, मूव्ही रेटिंग इत्यादी टास्क करत गेल्या. त्यांच्या लिंकवरून तयार झालेल्या विशिष्ट खात्यात रक्कमदेखील येत होती. ती रक्कम काढण्याचा त्यांनी प्रयत्न केला. मात्र टेलिग्रामवर त्यांना खूप जास्त प्रयत्न झाल्याचा मॅसेज आला व पैसे निघाले नाहीत. काही वेळातच त्यांना मनी लॉंडरिंग, कॅपिटल सिक्युरिटी इत्यादी कारणे देत समोरील व्यक्तीने जमा झालेल्या रकमेच्या ५० टक्के रक्कम भरली तरच पैसे काढता येतील, असे सांगितले. तिच्यावर विश्वास ठेवून कल्याणी यांनी पैसे पाठविले. मात्र त्यांना रक्कम मिळाली नाही. त्यांनी टेलिग्रामवर मॅसेज पाठविले असता काही खाती डिलीटदेखील झाली. सायबर गुन्हेगारांनी त्यांची १२ लाख ८० हजार रुपयांनी फसवणूक केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी सायबर सेलला तक्रार केली. पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केल आहे.