१२ लाखांवर नागपूरकर दारिद्र्यरेषेखाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2017 11:57 PM2017-10-16T23:57:53+5:302017-10-17T00:00:00+5:30
सरकार कुठल्याही पक्षाचे असो गरिबी दूर करण्याचा आणि नागरिकांचे जीवनमान उंचावण्याच्या दावा नेहमीच केला जातो.
आनंद डेकाटे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सरकार कुठल्याही पक्षाचे असो गरिबी दूर करण्याचा आणि नागरिकांचे जीवनमान उंचावण्याच्या दावा नेहमीच केला जातो. परंतु हा दावा कितीही केला जात असला तरी वस्तुस्थिती वेगळीच आहे. एकट्या नागपुरात तब्बल २ लाख ४० हजार ६२२ कुटुंबातील १२ लाख ४७ हजार ५३ लोक दारिद्र्यरेषेखाली असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे.
नागपूर शहर व ग्रामीण भागातील शिधापत्रिकेचा विचार केला तर अतिशय भयावह चित्र समोर येते. सर्वधारणपणे बीपीएल म्हणजे दारिद्र्य रेषेखालील व्यक्ती अशी समज आहे. परंतु शिधापत्रिकेचा विचार केला तर बीपीएलपेक्षाही खाली असलेली व्यक्ती म्हणजे अंत्योदय शिधापत्रिकाधारक होय. नागपुरात एकूण २ लाख ४० हजार अंत्योदय व बीपीएल शिधापत्रिकाधारक कुटुंब आहेत. त्यांची एकूण सदस्य संख्या ही १२ लाख ४७ हजार ५३ इतकी आहे. नागपूर शहरात ३९,२०५ इतके अंत्योदय शिधापत्रिकाधारक तर ६१,८०५ बीपीएल कार्डधारक आहेत. त्यांची या कुटुंबातील एकूण सदस्य संख्या ५ लाख ४८ हजार २५४ इतकी आहे. तर ग्रामीण भागात ६९,४१२ अंत्योदय व ७०,१५३ बीपीएल कार्डधारक आहेत. त्यांच्या कुटुंबातील एकूण सदस्य संख्या ६,९८,७९ इतकी आहे. सरकारतर्फे रेशन दुकानातून अंत्योदय व बीपीएल कार्डधारकांना गहू व तांदूळ माफक दरात उपलब्ध करून दिले जाते. २०१४ पासून अन्न सुरक्षा योजना अंमलात आली. या योजनेनुसार एपीएल कार्डधारकांपैकी काही कुटुंबांनासुद्धा अन्नधान्य पुरवठा सुविधेचा लाभ दिला जातो. त्याला एपीएल प्राधान्यगट असे म्हटले जाते. नागपुरात तब्बल ३ लाख ५६ हजार ९२३ एपीएल कार्डधारकांना अन्नधान्य पुरवठ्याचा लाभ दिला जातो. अशा कार्डधारक कुटुंबातील एकूण सदस्यांची संख्या १६ लाख ९० हजार ६४१ इतकी आहे.
रेशनकार्ड नसणाºयांची संख्याही मोठ्या प्रमाणावर
अंत्योदय व बीपीएल रेशन कार्डधारकांची ही संख्या अधिकृतरीत्या आहे. परंतु नागपुरात रेशन कार्ड नसणाºया कुटुंबांची संख्याही मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे दारिद्र्य रेषेखालील लोकांची संख्या यापेक्षाही अधिक राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.