तुमच्या जवळचा कुणी आत्महत्येच्या गर्तेत तर नाही ना? काेविडनंतर वाढले १८ टक्के प्रमाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2022 02:26 PM2022-09-10T14:26:55+5:302022-09-10T14:30:06+5:30
एका लाखात १२ लाेक पत्करतात जीवघेणा मार्ग
निशांत वानखेडे
नागपूर : जगात दरवर्षी १० लक्ष लाेक आत्महत्या करतात व २० पट लाेक तसा प्रयत्न करतात. त्यात भारताचे प्रमाण अधिक आहे. पूर्वी ६० वर्षांवरील वयाेगटातील लाेकांचे प्रमाण अधिक हाेते, पण आता प्राैढ व तरुणांमध्ये आत्महत्येची वाढ झाली आहे. देशात दर एका लाखात १२ लाेक हा जीवघेणा मार्ग पत्करतात. काेराेनानंतर या प्रमाणात १८ टक्के वाढ झाल्याची नाेंद आहे. मात्र या आत्महत्या राेखल्या जाऊ शकतात. हा एका क्षणाचा निर्णय असला तरी त्यामागे बऱ्याच कारणांनी आलेली प्रक्रिया असते. म्हणून सजगतेने लक्ष दिले तर आत्महत्या करणाऱ्याला थांबविले जाऊ शकते, असे मत मानसाेपचारतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
दक्षिण-पूर्व आशियात भारत हा ‘सुसाईड कॅपिटल’ म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. २०१९ साली १,३९,१२३ लाेकांनी आत्महत्या केल्याची नाेंद आहे, जी २०१८ च्या तुलनेत ३.४ टक्के अधिक आहे. २०२१ साली ही संख्या १,६४,०३३ एवढी हाेती. ९३ टक्के आत्महत्या या मानसिक समस्यांमधून हाेतात. नैराश्य व व्यसनाधीन व्यक्तींचे प्रमाण ६० टक्के आहे. जगात हे तिसऱ्या क्रमांकाचे मृत्यूचे कारण आहे. तरुणांमध्ये दुसऱ्या क्रमांकाचे मृत्यूचे कारण आत्महत्या आहे. मानसाेपचारतज्ज्ञ डाॅ. सागर चिद्दरवार यांनी आत्महत्येमागे असलेल्या कारणांची मीमांसा केली.
तरुणांमध्ये साेशल मीडियाचा अतिवापर
- गेल्या काही वर्षांत तरुणांचे प्रमाण वाढले आहे. हे दुसऱ्या क्रमांकाचे मृत्यूचे कारण आहे.
- तरुणांमध्ये साेशल मीडियाचा अतिवापर धाेकादायक ठरला आहे.
- याशिवाय परीक्षेमध्ये अपयश किंवा अपयशाची भीती, शैक्षणिक स्पर्धेत अपयशाची भीती, न्यूनगंड, यशाचा दबाव.
- दु:खीपणा, संभ्रम, राग, सहन करण्याची क्षमता कमी हाेणे, चुकीचे राेल माॅडेल.
- प्रेमप्रकरणे, प्रेमात अपयश, मैत्री कमी हाेणे, साेशल मीडियाने एकटेपणा वाढणे.
- लहान मुलांचेही प्रमाण वाढले आहे. काैटुंबिक इतिहास, माेबाईलमधून हिंसक गाेष्टींचा प्रभाव, काही गमावण्याचे दु:ख, नकार, मातापित्याचे काैटुंबिक कलह, सहनशीलता कमी हाेणे.
का करतात लाेक आत्महत्या?
- ९३ टक्के आत्महत्या मानसिक समस्यांमधून हाेतात. ६० टक्के नैराश्य व व्यसनाधीनता.
- ३३.६ टक्के काैटुंबिक कारणे तर १८ टक्के दुर्धर आजाराची कारणे.
- याशिवाय ड्रग अॅडिक्शन, लग्नविषयक समस्या, प्रेमप्रकरणे, बेराेजगारी, गरिबी, करिअर, प्राेफेशनल कारणे.
- काेराेनानंतर आत्महत्यांमध्ये १८ टक्के वाढ झाली आहे. व्यावसायिक अपयश, नाेकरीमधील अपयश, दिवाळखाेरी, बेराेजगारी.
- १८ ते ३० व ३० ते ४५ वयाेगटात महिला अधिक तर वयाेवृद्धांमध्ये पुरुष अधिक.
- भावनिक गुंतागुंत, भ्रमिष्टपणा, न्यूनगंड, निराशावादी, मदतीस कुणी नसल्याची भावना.
आपण त्यांना वाचवू शकताे
- डाॅ. सागर चिद्दरवार यांच्या मते समस्या गुंतागुंतीची असली तरी राेखली जाऊ शकते.
- संबंधित व्यक्तीला ओळखा : ज्या व्यक्तीच्या मनात तसे विचार येतात, त्यांचे वागणे अचानक बदलते.
- पूर्वी आत्महत्येचा प्रयत्न केला असेल तर.
- आयुष्यात काही घडले असेल तर : बालपणीचा वाईट अनुभव.
- वैयक्तिक स्तरावर समुपदेशन, मार्गदर्शन, माेटिव्हेशन. मानसाेपचारतज्ज्ञांचा सल्ला घेणे, प्राेत्साहित करणे.
- व्यापक स्तरावर प्रयत्न : सामाजिक, शासकीय, राजकीय स्तरावर उपाययाेजना.
- बाल्यावस्थेत समस्या साेडविण्याचे काैशल्य.
- जग, निसर्ग, मित्र, कुटुंब यांचे महत्त्व जाणून देणे.