मधुमेहामुळे अंधत्वाचे प्रमाण १२ टक्के
By admin | Published: November 14, 2014 12:45 AM2014-11-14T00:45:25+5:302014-11-14T00:45:25+5:30
मधुमेहामुळे १२ टक्के लोकांना अंधत्व येते. बुब्बुळावर जंतुसंसर्ग, काचबिंदू, कमी वयात मोतिबिंदू, तिरळेपणा या सर्व आजारास मधुमेह कारणीभूत आहे. मधुमेही रुग्णांनी त्यांना डोळ्याचा त्रास नसला
मधुमेहामुळे होतो काचबिंदू, मोतीबिंदू : अशोक मदान यांची माहिती
नागपूर : मधुमेहामुळे १२ टक्के लोकांना अंधत्व येते. बुब्बुळावर जंतुसंसर्ग, काचबिंदू, कमी वयात मोतिबिंदू, तिरळेपणा या सर्व आजारास मधुमेह कारणीभूत आहे. मधुमेही रुग्णांनी त्यांना डोळ्याचा त्रास नसला तरी वर्षातून एकदा डोळ्याची तपासणी करून घेणे आवश्यक आहे, अशी माहिती मेडिकलच्या नेत्ररोग विभागाचे विभागप्रमुख डॉ. अशोक मदान यांनी दिली.
डॉ. मदान म्हणाले, देशात मधुमेहाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. या आजाराचा शरीराच्या इतर अवयवांसोबतच डोळ्यांवर मोठा परिणाम होतो. मधुमेहामुळे डोळ्याच्या मागच्या पडद्यावर रक्ताच्या गाठी तयार होतात; यामुळे डोळ्याच्या मागचा पडदा सरकतो व रक्तस्राव होतो. यामुळे नजर जाण्याची शक्यता अधिक असते. म्हणूनच मधुमेहींनी वरच्यावर डोळ्यांची तपासणी करणे आवश्यक आहे. मेडिकलमध्ये अशा रुग्णांसाठी दृष्टिपटलाची तपासणी, डोळ्याच्या दाबाची मोजणी केली जाते. विशेष म्हणजे, मधुमेहामुळे ज्यांना किडनीचे आजार उद्भवले आहेत, अशा रुग्णांनी नियमित डोळे तपासणी करावी.
रक्तवाहिन्या बंद
होऊ शकतात
डायबेटिक रेटिनोपॅथीसाठी डोळ्यांची नियमित तपासणी आवश्यक आहे. मधुमेहामुळे रक्तवाहिन्या बंद होऊ शकतात. रेटिना(डोळ्याच्या आतील पडदा)वरील रक्तवाहिन्या खराब झाल्या तर रेटिनावर पांढरे आणि लाल ठिपके डोळे तपासताना डॉक्टरांना आढळून येतात. असे ठिपके आले तरी रुग्णांना कळत नाही. पण त्यासाठी वेळेवर उपचार करणे गरजेचे असते. ते उपचार न केल्यास डोळा आतून खराब होऊन अंधत्व येण्याची शक्यता असते. (प्रतिनिधी)
५० टक्के मधुमेही अनभिज्ञच
५० टक्के मधुमेहींना नेत्ररोगाची माहितीच राहत नाही. ज्यावेळी खूप जास्त त्रास होतो, त्यावेळी ते उपचारासाठी डॉक्टरांकडे येतात. परंतु अशावेळी अंधत्व रोखणे कठीण जाते. मेडिकलसह शासकीय इस्पितळांमध्ये अशा रुग्णांच्या तपासणीची विशेष सोय आहे. मधुमेहींमध्ये दृष्टी वाचविण्यावर जनजागृती होणे गरजेचे आहे.
-डॉ. अशोक मदान
विभागप्रमुख, नेत्ररोग विभाग, मेडिकल