राज्यात बिअर विक्रीत १२ टक्क्यांनी वाढ; उत्पादन शुल्कापोटी २ हजार ३४ कोटींचा महसूल प्राप्त
By योगेश पांडे | Published: December 19, 2023 08:17 PM2023-12-19T20:17:40+5:302023-12-19T20:19:15+5:30
राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांची माहिती
योगेश पांडे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: राज्यात बिअरच्या विक्रीत मागील वर्षीच्या तुलनेत १२ टक्क्यांची वाढ झाली असून शासनाला विक्रीच्या उत्पादन शुल्कापोटी २ हजार ३४ कोटींचा महसूल प्राप्त झाला असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. राज्यातील बिअरच्या दराबाबत शासनाने नेमलेल्या समितीबाबत सत्यजीत तांबे यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. याच्या लेखी उत्तरात देसाई यांनी ही माहिती दिली.
राज्याचे महसूली उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने उत्पादन शुल्क विभागाकडून विविध प्रयत्न करण्यात येत आहे. राज्यातील बिअरबाबतच्या धोरणांचा अभ्यास करून महसूल वाढीच्या दृष्टीने १९ ऑक्टोबरच्या शासन निर्णयानुसार समिती स्थापन करण्यात आली आहे. मात्र बिअरवरील उत्पादन शुल्क कमी करण्यात आलेले नाही. अमरावती, नागपूर व नांदेड विभागात एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीत बिअर विक्रीत कुठलीही घट झालेली नाही. इतर राज्यात कार्यरत असलेल्या व इतर आधुनिक प्रणालींचा अभ्यास करून राज्यात ट्रॅक ॲंड ट्रेस प्रणालीची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने सल्लागार संस्थेची निवड करण्यात आली असल्याची माहितीदेखील देसाई यांनी दिली.