नागपुरातील १२ रेशन दुकानांचे परवाने निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2018 09:26 PM2018-11-14T21:26:00+5:302018-11-14T21:29:22+5:30
लाभार्थ्यांना अर्धे रेशन देऊन त्यांना पूर्ण कोट्याचे धान्य दिल्याचे दाखवण्यात येत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत अन्न व पुरवठा विभागाने अतिशय कठोर भूमिका घेतली आहे. यासंदर्भात आलेल्या तक्रारीनुसार चौकशी करून १२ रेशन दुकानांचे परवाने निलंबित करण्यात आले आहे. यासोबतच विभागाने शहरातील सर्व रेशन दुकानांची चौकशी सुरू केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लाभार्थ्यांना अर्धे रेशन देऊन त्यांना पूर्ण कोट्याचे धान्य दिल्याचे दाखवण्यात येत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत अन्न व पुरवठा विभागाने अतिशय कठोर भूमिका घेतली आहे. यासंदर्भात आलेल्या तक्रारीनुसार चौकशी करून १२ रेशन दुकानांचे परवाने निलंबित करण्यात आले आहे. यासोबतच विभागाने शहरातील सर्व रेशन दुकानांची चौकशी सुरू केली आहे.
जिल्हा धान्य पुरवठा अधिकारी प्रशांत काळे यांनी ही माहिती दिली. लोकमतने प्रकाशित केलेल्या वृत्ताचा उल्लेख करीत त्यांनी सांगितले की, लाभार्थ्यांना त्यांच्या कोट्याचे धान्य वितरित न करणाऱ्या रेशन दुकानांविरुद्ध कठोर कारवाई केली जाणार आहे. लोकमतने १० नोव्हेंबर रोजी , धान्य कमी बिल जास्त’ या शिर्षकांतर्गत वृत्त प्रकाशित करीत रेशन दुकनातील काळाबाजार उघडकीस आणला होता. अंत्योदय योजना सुरु करण्यात आली आहे. याअंतर्गत लाभार्थ्यांना दोन रुपये किलो प्रमाणे २० किलो गहू, आणि ३ रुपये प्रति किलोप्रमाणे १५ किलो तांदूळ दिले जाते. यासोबतच ३५ रुपये किलो तूर डाळ आणि २० रुपये किलो साखर देण्याचीही तरतूद आहे. लाभार्थ्यांनुसार सर्व कागदोपत्री आहे. लाभार्थ्यांना गहू व तांदूळ कोट्यानुसार मिळत नाही. अर्धेच दिले जाते. बिल मात्र पूर्ण कोट्याचे दिले जाते. डाळ आणि साखर दिलीच जात नाही. भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी याबाबत निवेदनही सादर केले होते.
यासंदर्भात विचारणा केली असता प्रशांत काळे यांनी अन्न व पुरवठा विभागातर्फे याची सखोल चौकशी केली जात असल्याचे सांगितले. प्रत्येक दुकानांची तपासणी केली जात आहे. चार ते पाच दिवसात अहवाल सदर केला जाईल. या आधरावर दोषींविरुद्ध कारवाई केली जाईल. अशाच प्रकारे यापूर्वीही आलेल्या तक्रारीवर १२ दुकानांचे परवाने निलंबित केले असून आर्थिक दंडही ठोठावल्याचे त्यांनी सांगितले.
तक्रार करण्याचे आवाहन
कुठल्याही लाभार्थ्यास कोट्यापेक्षा कमी धान्य मिळत असेल. बिल दिले जात नसेल किंवा इतर काही समस्या असल्यास त्यांनी रेशन दुकानदाराची विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी प्रशांत काळे यांनी केले आहे. आॅनलाईनही तक्रार करता येऊ शकते. लाभार्थ्यांची तक्रार आल्यास संबंधिताची चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.