नागपूर दंत महाविद्यालयाच्या ‘बीडीएस’च्या १२ जागा रिक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2019 11:57 AM2019-09-24T11:57:13+5:302019-09-24T11:58:38+5:30
शासकीय दंत महाविद्यालयातील दंत वैद्यक पदवी (बीडीएस) अभ्यासक्रमाच्या यावर्षी ५० पैकी १२ जागा शिल्लक राहिल्या आहेत. ‘मॉप अप राऊंड’ झाल्यानंतरही रिक्त जागांचा विळखा कायम आहे.
सुमेध वाघमारे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शासकीय दंत महाविद्यालयातील दंत वैद्यक पदवी (बीडीएस) अभ्यासक्रमाच्या यावर्षी ५० पैकी १२ जागा शिल्लक राहिल्या आहेत. ‘मॉप अप राऊंड’ झाल्यानंतरही रिक्त जागांचा विळखा कायम आहे. प्रवेश प्रक्रियेच्या पद्धतीत घोळ असल्याने याचा फटका विद्यार्थ्यांना बसत आहे. या प्रक्रियेत आणखी सुधारणा होण्याची गरज असल्याचे तज्ज्ञाचे म्हणणे आहे.
नागपूरच्या शासकीय दंत महाविद्यालयातील ‘बीडीएस’ अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त आणि जागा कमी राहत असल्याने २०१३ मध्ये भारतीय दंत परिषदेने (डीसीआय) वाढीव दहा जागेला मंजुरी दिली. यामुळे या जागा ४० वरून ५० झाल्या. परंतु प्रवेश प्रक्रियेतील घोळामुळे दरवर्षी पूर्ण जागा भरल्या जात नसल्याचे वास्तव आहे. ‘बीडीएस’ अभ्यासक्रमांचे प्रवेश सीईटी सेलच्या मार्फत राबिवण्यात आले. ‘मॉप अप राऊंड’ ही घेण्यात आला परंतु त्यानंतरही तब्बल १२ जागा शिल्लक राहिल्या.
वैद्यकीय क्षेत्रात करिअर करणारे विद्यार्थी सर्वप्रथम ‘एमबीबीएस’ला प्राधान्य देतात, येथे प्रवेश न मिळाल्यास ‘बीडीएस’साठी प्रयत्न करतात. परंतु गेल्या काही वर्षात ह्यबीडीएसह्णमध्ये भविष्यातील एकूण संधी मर्यादित झाल्या आहेत. यामुळे विद्यार्थ्यांची संख्या कमी होऊ लागली आहे. या शिवाय, राज्यात पुढील वर्षात पाच ते सहा वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याची घोषणा करण्यात आली आहे. परिणामी, ‘एमबीबीएस’च्या जागाही वाढणार आहे. यामुळे एक वर्ष थांबून ‘बीडीएस’पेक्षा ‘एमबीबीएस’ला प्रवेश मिळवू असा विचार विद्यार्थी करीत असल्याने या जागा शिल्लक राहिल्या असाव्यात, असे बोलले जात आहे. परंतु तज्ज्ञानुसार ‘कट ऑफ डेट’ शेवटच्या दिवसाला घेतले जात असलेले ‘मॉप अप राऊंड’ आणि ‘कट ऑफ मार्क्स’ यात सुधारणा केल्यास ‘बीडीएस’च्या संपूर्ण जागा भरल्या जातील, अशी शक्यताही वर्तवली जात आहे.