नागपूर पोलीस नियंत्रण कक्षात रोज १२ हजार फोन कॉल्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2017 04:35 PM2017-10-11T16:35:29+5:302017-10-11T16:39:03+5:30

शहर पोलीस नियंत्रण कक्षात २४ तासात १२ हजार फोनकॉल्स येतात. त्यापैकी किमान १० हजार फोनवरून पोलिसांना विविध गुन्ह्यांची, अपघाताची, भांडण-तंटा, तणाव याची माहिती फोन करणारे देत असतात.

12 thousand phone calls to the police control room everyday | नागपूर पोलीस नियंत्रण कक्षात रोज १२ हजार फोन कॉल्स

नागपूर पोलीस नियंत्रण कक्षात रोज १२ हजार फोन कॉल्स

Next
ठळक मुद्देउपराजधानीतील गुन्हेगारीचे नियंत्रण मिनिटामिनिटात फोनरिसिव्हर्सची अवस्था शब्दातीत

नरेश डोंगरे
लोकमत न्यूज नेटवर्क
तासाभरात १० किंवा १२ फोन आले तर माणसाचं डोक ठणठणतं. पुढच्या तासात जर फोनचे असेच वाजणे सुरू राहिले तर माणूस अस्वस्थ होतो अन् फोनची घंटी त्याच क्रमाने आणि त्याच संख्येत दिवसभर खणखणत असेल तर डोक फोडाव की फोन फेकून फोडून टाकावा, असा विचार (नव्हे, संताप) आपसुकच संबंधित फोनधारकाच्या डोक्यात येतो. परंतु... एखाद्या व्यक्तीला दिवसभर सलगपणे दर दोन मिनिटांनी सारखा फोन ऐकावा लागत असेल तर... दिवसभरात त्याला १०/२० नव्हे, तब्बल ३०० फोन ऐकावे लागत असेल तर... तर, काय होईल त्याच्या मनाची अन् कानाची अवस्था ? त्याची कल्पना केलेलीच बरी!
संबंधित व्यक्ती किती अस्वस्थ होईल, चिडचिड करेल, हेच उत्तर कोणताही व्यक्ती देईल. मात्र, उपराजधानीतील काही पोलिसांना दरदिवशी ३०० फोन कॉल्स ऐकून घ्यावे लागतात. हे ऐकतानाच त्याला चिडचिड करता येत नाही किंवा अस्वस्थ होता येत नाही. कारण फोन ऐकणाºया पोलिसाने चिडचिड केली तर त्याची लगेच नोकरी जाऊ शकते. होय, हे वास्तव आहे. पोलीस नियंत्रण कक्षात काम करणाºया फोन रिसिव्हर्सचे!
मुंबईनंतर सर्वाधिक अत्याधुनिक नियंत्रण कक्ष म्हणून नागपूर पोलिसांच्या नियंत्रण कक्षाचा नामोल्लेख होतो. शहरातील २९ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडणाºया घडामोडींची माहिती घेणे आणि ती संबंधित पोलीस ठाण्यात देऊन तात्काळ गुन्ह्याच्या ठिकाणी पोलिसांना पाठविणे, कुठे अपघात झाला असेल किंवा कुठे तणाव झाला असेल त्या ठिकाणी पोलिसांना रवाना करून संबंधितांना मदत उपलब्ध करून देण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी पोलीस नियंत्रण कक्षावर असते. या नियंत्रण कक्षात एकूण २० फोन लाईन्स आहेत. दोन अधिकारी (सीआरओ) आणि ४० कर्मचाºयांसह एकूण ४२ पोलीस येथे दोन पाळीत काम करतात. एका पाळीत २० पोलीस कर्मचारी सलग ड्युटी संपेपर्यंत फोन ऐकत असतात. शहर पोलीस नियंत्रण कक्षात २४ तासात १२ हजार फोनकॉल्स येतात. त्यापैकी किमान १० हजार फोनवरून पोलिसांना विविध गुन्ह्यांची, अपघाताची, भांडण-तंटा, तणाव याची माहिती फोन करणारे देत असतात.
अर्थात् २० महिला पोलीस कर्मचाºयांना ६ हजार फोन कॉल्स रिसिव्ह करावे लागतात. म्हणजेच एका रिसिव्हरला तिची ड्युटी संपेपर्यंत तब्बल ३०० फोन कॉल्स लागतात. ते ऐकून त्याबाबतची माहिती आपल्या वरिष्ठामार्फत (सीआरओ) संबंधित पोलीस ठाण्याच्या अधिकारी-कर्मचाºयांना द्यावी लागते. त्यात दोन तीन लाईन्स खराब झाल्या तर हा आकडा ४०० पर्यंत जातो.
एका रात्री अशाच प्रकारे बीएसएनएलच्या एकदम पाच लाईन्स बंद पडल्या. त्यामुळे नियंत्रण कक्षातील मंडळींची प्रचंड भंबेरी उडाली. त्या रात्री वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त रवींद्रसिंग परदेशी यांचा नाईट राऊंड होता. त्यांना ही माहिती कळताच ते नियंत्रण कक्षात पोहोचले. पहाटे २ वाजताची ही वेळ होती. त्यांनी लगेच बीएसएनएलच्या महाव्यवस्थापक तिवारी यांच्याशी संपर्क केला. तेवढ्या रात्री तिवारी यांनी आपल्या सहकाºयांमार्फत दुरुस्तीचे निर्देश दिले आणि पुढच्या तासाभरात सर्व लाईन्स सुरळीत झाल्या होत्या.
एक महिला पोलीस रोजच्या रोज तब्बल ३०० वर फोन ऐकत असेल तर तिची अवस्था कशी होत असेल, याची कल्पना केलेलीच बरी!
पीडितांना तातडीने पोलीस मदत उपलब्ध करून देण्यासाठी, गुन्हे टाळण्यासाठी किंवा गुन्हेगारांना अटकाव करण्यासाठी आणि उपराजधानीतील गुन्हेगारी नियंत्रित करण्यासाठी या फोनची मदतही होते.
मात्र, फोन करणाºया १२ हजारांपैकी सुमारे १००० ते १२०० जण पोलिसांशी संबंधित नसलेली माहिती सांगतात. (उदा. आमच्या परिसरात रोज काही हॉकर्स मोठमोठ्याने ओरडतात, आमचा शेजारी घरासमोर रेती, गिट्टी टाकतो. शेजाºयाच्या झाडाचा कचरा नेहमीच आमच्या घरावर, अंगणात पडतो, आदी...) अनेक जण १०० क्रमांकावर फोन करून नुसतेच हॅलो... हॅलो... करतात. काही जण बोलतच नाही. तर, काही विकृती जडलेली मंडळी विनाकारण येथे फोन करून महिलांना त्यांचे नाव, गाव पत्ता विचारण्याच्या भानगडी करतात. अशा प्रकारे विकृती जडलेल्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर नंतर कारवाई देखिल केली जाते. फोन करणारे काही जण धमकी देखिल देतात.

चिमुकलेही घेतात फिरकी
२४ तासात ५०० वर फोन चिमुकल्यांचेही (लहान बालके) येतात. आई किंवा बाबांचा मोबाईल हातात असला की या बालकांच्या हातून सहजपणे १०० नंबर लागतो अन् ते निरागस महिला पोलिसांसोबत बोबडा संवाद साधत असतात. त्यांचा फोन बंद केला की पुन्हा ते रिडायल करतात अन् अनेकदा रिसिव्हरची निरागसपणे फिरकीही घेतात.

वरिष्ठांनी केले नियंत्रण 
विशेष म्हणजे, फोन कॉल्सचा हा अचंबित करणारा आकडा ऐकून आणि रिसिव्हरची होणारी अवस्था लक्षात घेऊन लोकमतच्या प्रस्तुत प्रतिनिधीने सहपोलीस आयुक्त शिवाजीराव बोडखे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याहीपेक्षा जास्त धक्कादायक माहिती दिली. जून-जुलै २०१७ पर्यंत नागपूरच्या पोलीस नियंत्रण कक्षाला २४ तासात तब्बल ३२ हजार फोन यायचे.
त्यामुळे नियंत्रण कक्षातील मंडळींची अवस्था वेडावल्यागत व्हायची. त्यावर उपाययोजना करताना शहरातील २९ पोलीस ठाण्यातील ह्यहॉट स्पॉटह्ण अधोरेखित करण्यात आले. त्या भागात पोलिसांची गस्त वाढवण्यात आली. सहज पोलीस उपलब्ध होईल, अशी व्यवस्था झाल्याने नियंत्रण कक्षात २४ तासात फोन करणाºयांचा आकडा आॅगस्टमध्ये ३२ हजारांहून २४ हजारांवर आला आणि आता आॅक्टोबरमध्ये तो १२ हजारांवर आला आहे. हा आकडा आणखी खाली यावा, यासाठी प्रयत्न केले जात असल्याचेही सहपोलीस आयुक्त बोडखे यांनी लोकमतला सांगितले.

Web Title: 12 thousand phone calls to the police control room everyday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.