१२ रेल्वेगाड्या येणार ट्रॅकवर : कुलींना मिळणार रोजगार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2020 11:03 PM2020-09-11T23:03:33+5:302020-09-11T23:05:26+5:30
कोरोनामुळे रेल्वेगाड्या बंद होत्या. त्यानंतर रेल्वे बोर्डाने विशेष रेल्वेगाड्या सुरू केल्या. परंतु रेल्वेस्थानकावरील १५० पेकी फक्त ४५ कुलींना रोजगार मिळाला आहे. त्यानंतर रेल्वेने आणखी १२ रेल्वेगाड्या सुरू करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे रेल्वेस्थानकावरील कुलींमध्ये आनंद व्यक्त करण्यात येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनामुळे रेल्वेगाड्या बंद होत्या. त्यानंतर रेल्वे बोर्डाने विशेष रेल्वेगाड्या सुरू केल्या. परंतु रेल्वेस्थानकावरील १५० पेकी फक्त ४५ कुलींना रोजगार मिळाला आहे. त्यानंतर रेल्वेने आणखी १२ रेल्वेगाड्या सुरू करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे रेल्वेस्थानकावरील कुलींमध्ये आनंद व्यक्त करण्यात येत आहे.
रेल्वेस्थानकावर कोरोनामुळे शुकशुकाट पसरला होता. त्यानंतर रेल्वेने विशेष रेल्वेगाड्या सुरू केल्या. रेल्वेस्थानकावर १५० कुली कार्यरत आहेत. सध्या त्यापैकी फक्त ४५ कुली कामावर येत आहेत. त्यातील केवळ ३० कुलींनाच काम मिळत आहे. परंतु आता रेल्वे बोर्डाने आणखी १२ रेल्वेगाड्या चालविण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे कुलींमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. काम मिळण्याच्या अपेक्षेने त्यांनी गावाकडून परत नागपूरला येण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. सध्या रेल्वेस्थानकावर आलेल्या प्रवाशांना ७ दिवसांसाठी क्वारंटाईन करण्यात येत आहे. परंतु काम मिळण्याच्या अपेक्षेने कुली ७ दिवस आपल्या उदरनिर्वाहाचा खर्च करून येण्यास तयार आहेत.
कुलींना ७ दिवसांसाठी क्वारंटाईन करावे
रेल्वेने प्रवास करून आलेल्या प्रवाशांना १४ दिवसांसाठी क्वारंटाईन करण्यात येत आहे. परंतु कुली अत्यंत अडचणीत आहेत. त्यामुळे त्यांना ७ दिवस क्वारंटाईन करण्याची गरज आहे.
-अब्दुल मस्जीद, रेल्वे कुली कल्याणकारी संस्था
शासनाच्या नियमांचे करीत आहोत पालन
१४ दिवस क्वारंटाईन करण्याचा शासनाचा नियम आहे. त्यामुळे आम्ही शासनाच्या नियमांचे पालन करीत आहोत. यात आम्ही कुठलाही बदल करू शकत नाही.
-एस. जी. राव, जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे, नागपूर विभाग