१२ वी अकाऊंटच्या उत्तरपत्रिका गहाळ

By admin | Published: March 26, 2017 01:35 AM2017-03-26T01:35:39+5:302017-03-26T01:35:39+5:30

राज्य शिक्षण मंडळाच्या बारावीच्या जीवशास्त्र व अकाऊंटचा पेपर एकाच दिवशी झाला. जीवशास्त्राच्या उत्तरपत्रिका मूल्यांकनासाठी संबंधित महाविद्यालयात पोहोचल्या आहेत.

12 V account's missing answer papers | १२ वी अकाऊंटच्या उत्तरपत्रिका गहाळ

१२ वी अकाऊंटच्या उत्तरपत्रिका गहाळ

Next

बोर्डाने पाठविल्या होत्या मूल्यांकनासाठी : शिक्षक करताहेत प्रतीक्षा
आशिष दुबे नागपूर
राज्य शिक्षण मंडळाच्या बारावीच्या जीवशास्त्र व अकाऊंटचा पेपर एकाच दिवशी झाला. जीवशास्त्राच्या उत्तरपत्रिका मूल्यांकनासाठी संबंधित महाविद्यालयात पोहोचल्या आहेत. परंतु अकाऊंटच्या उत्तरपत्रिका अद्याप पोहोचलेल्या नाहीत. बोर्डाचे अधिकारी यासंदर्भात समाधानकारक उत्तर देण्यास असक्षम ठरत आहेत. त्यामुळे अकाऊंटच्या उत्तरपत्रिका गहाळ झाल्याची शंका उपस्थित करण्यात येत आहे.
पेपर होऊन १५ दिवस लोटल्यानंतरही उत्तरपत्रिका महाविद्यालयात न पोहोचल्याने बोर्डाच्या विभागीय कार्यालयात खळबळ उडाली आहे. अधिकाऱ्यांनी उत्तरपत्रिकेची तपासणी सुरू केली आहे. परंतु अद्यापपर्यंत पोलिसात कुठलीही तक्रार दाखल करण्यात आली नाही. १० मार्चला अकाऊंटचा पेपर घेण्यात आला. पेपर झाल्यानंतर लगेच उत्तरपत्रिका बोर्डाच्या कस्टडीमध्ये पोहोचली. तेथून उत्तरपत्रिका पोस्टाच्या माध्यमातून महाविद्यालयांमध्ये पाठविण्यात आल्या. परंतु १५ दिवसानंतरही अकाऊंटची उत्तरपत्रिका शिक्षकांना मिळाली नसल्याचे वाणिज्य शाखेच्या शिक्षकांकडून सांगण्यात आले.
पेपर झाल्यानंतर उत्तरपत्रिका संबंधित महाविद्यालयात दोन ते तीन दिवसात पोहोचणे गरजेचे आहे. महाविद्यालयांमध्ये विषय शिक्षक दररोज उत्तरपत्रिकेच्या मूल्यांकनासाठी येत आहेत आणि रिकाम्या हाती परतत आहेत.
उत्तरपत्रिका मूल्यांकनासाठी महाविद्यालयांमध्ये का नाही पोहोचली, यासंदर्भात विभागीय सहसचिव श्रीराम चव्हाण यांच्याकडे विचारणा केल्यानंतर त्यांनी समाधानकारक उत्तर दिले नाही. ते म्हणाले की, पेपरनंतर पोस्टाचा एक दिवसाचा संप होता. त्यामुळे उत्तरपत्रिका पोहोचू शकल्या नसेल, परंतु लवकरच पोहोचविण्यात येईल. परंतु एकाच दिवशी जीवशास्त्र आणि अकाऊंटचे पेपर झाले.(प्रतिनिधी)

वर्षापूर्वी हरवलेली उत्तरपत्रिका अद्यापही मिळाली नाही
गेल्या वर्षी बोर्डाच्या परीक्षेच्या काळात सावनेरच्या एका परीक्षा केंद्रातून वाणिज्य शाखेच्या एका विद्यार्थ्याची उत्तरपत्रिका हरवली होती. ती अद्यापही मिळाली नाही. त्यामुळे बोर्डाने बचावात्मक भूमिका घेऊन विद्यार्थ्यांना अंदाजे गुण देऊन उत्तीर्ण केले होते. परंतु उत्तरपत्रिका नाही मिळाल्यामुळे बोर्डाने संबंधित केंद्र अधिकाऱ्यांकडून अहवाल मागितला होता. त्याआधारे पोलिसात तक्रारदेखील करण्यात आली होती. परंतु तीन दिवसांच्या आत तक्रार मागे घेण्यात आली. तक्रार मागे घेण्याचे कुठलेही कारण बोर्डाने सांगितले नाही.

Web Title: 12 V account's missing answer papers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.