एमआयडीसीतील १२ कामगारांचे अपहरण
By admin | Published: September 20, 2016 02:23 AM2016-09-20T02:23:18+5:302016-09-20T02:23:18+5:30
एमआयडीसीतील निको कंपनीतील १२ कामगारांचे ४ आरोपींनी अपहरण केले. या कामगारांना मारहाण करून
जबरदस्तीने वाहनात कोंबले : रायपूरमध्ये नेऊन सोडले
नागपूर : एमआयडीसीतील निको कंपनीतील १२ कामगारांचे ४ आरोपींनी अपहरण केले. या कामगारांना मारहाण करून रायपूर(छत्तीसगड)ला सोडून देण्यात आले. पुन्हा नागपुरात परत आल्यास परिणाम गंभीर होतील, अशी धमकीही देण्यात आली.
अपहृत कामगार सरथी पालटा सिंग (वय ४०, ओडिशा) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, शुक्रवारी मध्यरात्रीनंतर शिवीगाळ आणि मारहाण करीत चार ते सहा आरोपींनी सरथी तसेच अन्य ११ कामगारांना एमएच ४०/ एआर ४१२३ तसेच एमएच ४०/ एआर १८७४ क्रमांकाच्या टाटा सफारीत कोंबले. त्यांना रायपूर येथे नेले. तेथेही त्यांना बेदम मारहाण करण्यात आली. त्यानंतर चारपैकी एका आरोपीने ‘राऊकवार साहाबसे पंगा मत लेना नही तो गोली मार देंगे’ अशी धमकी दिली आणि पुन्हा परत येऊ नका, अशी दमदाटी करीत आरोपी पसार झाले.
दरम्यान, यातील काही कामगार रविवारी नागपुरात परतले. त्यांनी ठेकेदाराला अपहरणाची माहिती दिली. ठेकेदाराने दिलेल्या सल्ल्यानुसार, एमआयडीसी ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी आरोपींविरुद्ध अपहरण, मारहाण करणे, धमकी देण्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला. या घटनेची वार्ता कंपनी परिसरात पोहचताच खळबळ उडाली.
प्रकरण चिघळण्याचे संकेत मिळाल्याने सोमवारी सकाळपासून पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी धावपळ सुरू केली. एमआयडीसी पोलिसांकडे यासंबंधाने संपर्क साधला अपहृत व्यक्ती किंवा फिर्यादी हे आरोपींना नावाने ओळखत नसल्यामुळे चौकशी सुरू असल्याचे सहायक पोलीस निरीक्षक गायकवाड यांनी सांगितले.(प्रतिनिधी)
लेबर कॉन्ट्रॅक्टरमधील स्पर्धा
शहरातील विविध कंपन्या आणि प्रकल्पात कामगार पोहचविण्यासाठी अनेक कंत्राटदार कामी लागले आहेत. ते कंपनी किंवा प्रकल्पातील कामांचे कंत्राट घेतात अन् ठेका पद्धतीने हे काम दुसऱ्या कामगारांना सोपवितात. स्थानिक मजुरांच्या तुलनेत छत्तीसगड, मध्य प्रदेश, ओडिशा येथून आणलेल्या मजुरांना खूपच कमी मोबदला दिला जातो. बऱ्यापैकी पैसे मिळावे म्हणून ही बिचारी मंडळी रात्रंदिवस काम करतात. अनेकदा दुसऱ्या ठेकेदाराकडून कामगारांची पळवापळवीही होते. ओडिशातील सरथी सिंग आणि अन्य कामगार ८ सप्टेंबरला ठेकेदाराकडे कामाला लागली होती. ठेकेदारांमधील स्पर्धेतूनच हा अपहरणाचा प्रकार घडला असावा, असा संशय आहे.