बलात्कार करणाऱ्याला १२ वर्षे कारावासाची शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2019 09:19 PM2019-04-16T21:19:42+5:302019-04-16T21:20:58+5:30
नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार करणाऱ्या आरोपीला विशेष सत्र न्यायालयाने मंगळवारी १२ वर्षे सश्रम कारावास व ८००० रुपये दंड आणि दंड न भरल्यास ८० दिवस अतिरिक्त कारावास अशी कमाल शिक्षा सुनावली. न्यायाधीश व्ही. जी. रघुवंशी यांनी हा निर्णय दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार करणाऱ्या आरोपीला विशेष सत्र न्यायालयाने मंगळवारी १२ वर्षे सश्रम कारावास व ८००० रुपये दंड आणि दंड न भरल्यास ८० दिवस अतिरिक्त कारावास अशी कमाल शिक्षा सुनावली. न्यायाधीश व्ही. जी. रघुवंशी यांनी हा निर्णय दिला.
विलास ताना ढोबळे (२५) असे आरोपीचे नाव असून तो मोहगाव (भदाडे), ता. नरखेड येथील रहिवासी आहे. त्याला बलात्काराच्या गुन्ह्यामध्ये वरीलप्रमाणे, अल्पवयीन मुलीला गर्भवती करण्याच्या गुन्ह्यामध्ये ७ वर्षे कारावास व ५००० रुपये दंड तर, अपहरणाच्या गुन्ह्यामध्ये ३ वर्षे सश्रम कारावास व २००० रुपये दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे. आरोपीने पीडित मुलीचे नोकरीचे आमिष दाखवून अपहरण केले व त्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी त्यांना शोधून काढले. त्यानंतर मुलीने ८ ऑक्टोबर २०१७ रोजी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवून आरोपीच्या कुकृत्याचा पाढा वाचला. घटनेच्या वेळी पीडित मुलगी १५ वर्षे वयाची होती. ती इयत्ता दहावीमध्ये शिकत होती. तपास अधिकारी रमेश ताजने यांनी आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले. न्यायालयात सरकारतर्फे अॅड. दीपिका गवळी यांनी कामकाज पाहिले.