नागपुरात परवाना धारकांकडून १२० शस्त्र जमा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2019 09:14 PM2019-03-16T21:14:45+5:302019-03-16T21:16:52+5:30
लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणूक कालावधीत भारत निवडणूक आयोगाने शस्त्र बाळगण्यावरील निर्बधानुसार तसेच आदर्श आचारसंहिता लागू झाल्यामुळे जिल्ह्यातील परवानाधारकांकडून १२० शस्त्रे जमा करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिली.
लोकतम न्यूज नेटवर्क
नागपूर : लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणूक कालावधीत भारत निवडणूक आयोगाने शस्त्र बाळगण्यावरील निर्बधानुसार तसेच आदर्श आचारसंहिता लागू झाल्यामुळे जिल्ह्यातील परवानाधारकांकडून १२० शस्त्रे जमा करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिली.
लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासोबतच निवडणूक निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांच्या अध्यक्षतेखाली छाननी समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीस जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी रवींद्र कुंभारे उपस्थित होते.
जिल्ह्यात आचारसंहिता लागू झाली असून निवडणूक कालावधीमध्ये शस्त्र अथवा हत्यारे यांचा गैरवापर होऊ नये तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्ह्यातील परवानाधारकांना शस्त्रे जमा करणे आवश्यक असल्याने नागपूर ग्रामीण जिल्ह्यातील शस्त्र संबंधित पोलीस स्टेशन येथे जमा करून घेण्याबाबत निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार १२० शस्त्र जमा करून घेण्यात आली आहेत. उर्वरित परवानाधारकांची पडताळणी करण्यात आली असून बंदोबस्तासाठी असणारे अधिकारी, कर्मचारी तसेच बँक व सार्वजनिक मालमत्तेच्या सुरक्षेसाठी नेमण्यात आलेल्या सुरक्षा कर्मचारी यांना वगळण्यात आले आहे. परंतु या सर्व सुरक्षा कर्मचाऱ्यांकडून शस्त्राचा गैरवापर होणार नाही, याची संपूर्ण जबाबदारी संबंधित बँक तसेच संस्थेच्या अधिकाऱ्यांची राहील असेही जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी स्पष्ट केले आहे.