चार दिवसांत आले बाराशे अर्ज; नितीन गडकरींच्या उपस्थितीत देवेंद्र फडणवीस यांनी भरला अर्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2024 10:22 AM2024-10-26T10:22:42+5:302024-10-26T10:24:31+5:30
मंत्री उदय सामंत, अतुल सावे यांचेही अर्ज दाखल
लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर/मुंबई: विधानसभेच्या २८८ मतदारसंघात निवडणुकीकरिता नामनिर्देशन पत्र भरण्याच्या चौथ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी राज्यातून आजपर्यंत ९९१ उमेदवारांचे १२९२ नामनिर्देशन पत्र दाखल झाली आहेत, अशी माहिती, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या नागपूर शहरातील तीन उमेदवारांनी शुक्रवारी निवडणूक नामांकन अर्ज दाखल केला. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हेदेखील उपस्थित होते. हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत यावेळी ‘रॅली’ काढून महायुतीने शक्तिप्रदर्शन केले.
सकाळी फडणवीस व गडकरी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण केले व त्यानंतर ‘रॅली’ सुरू झाली. दुपारी सव्वा बाराच्या सुमारास ‘रॅली’ जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचली. त्यानंतर निवडक नेत्यांसह फडणवीस यांनी दक्षिण-पश्चिम नागपूर मतदारसंघासाठी अर्ज दाखल केला. त्यानंतर दक्षिण नागपूर मतदारसंघाचे उमेदवार मोहन मते व पूर्व नागपूर मतदारसंघाचे उमेदवार कृष्णा खोपडे यांचे अर्ज दाखल करण्यात आले.
पिक्चर अभी बाकी हैं...
नागपुरात मागील १० वर्षांत बराच विकास झाला आहे. आजवर जेवढा विकास तुम्ही पाहिला तो फक्त ट्रेलर होता, असली पिक्चर तो अभी बाकी हैं, असे प्रतिपादन गडकरी यांनी केले. दरम्यान, निवडणूक अर्ज दाखल करण्याअगोदर फडणवीस यांनी गडकरी यांच्या निवासस्थानी सपत्नीक भेट दिली. त्यावेळी कांचन गडकरींनी फडणवीस यांचे औक्षण केले.
यांचेही अर्ज दाखल
मंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरीमधून, औरंगाबाद पूर्वमधून अतुल सावे आणि औरंगाबाद पश्चिम मतदारसंघातून संजय शिरसाट यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.
महायुतीच सत्तेवर येणार; फडणवीसांचा दावा
- गेली २५ वर्षे विधान मंडळाचा सदस्य म्हणून जनतेने माझे काम पाहिले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महायुती सरकारने जे काम केलेले आहे त्याचा आशीर्वाद आम्हाला मिळेल व पुन्हा एकदा महायुती सत्तेवर येईल हा मला विश्वास आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
- नाना पटोले यांनी आरक्षणाबाबत मांडलेल्या भूमिकेवर त्यांनी भाष्य केले. नाना पटोले हे कट्टर राहुल गांधी भक्त आहेत. राहुल गांधी विदेशात जाऊन आरक्षणविरोधी भूमिका मांडतात आणि त्याचे पटोले समर्थन करतात हे अत्यंत दुर्दैवी आहे.
- काँग्रेसने नेहमी बाबासाहेब आंबेडकर व आरक्षणाचा विरोध केला आहे. जोपर्यंत भारतीय संविधान आणि देशात भाजप आहे तोपर्यंत आरक्षण कोणीही संपवणार नाही. पटोले हे माझे मित्र आहेत, परंतु ते कुठल्या सर्कसमधले आहेत, हेदेखील मला माहिती आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.