आयकर विभागाची १२०० कोटींवर नजर
By Admin | Published: February 17, 2017 03:00 AM2017-02-17T03:00:49+5:302017-02-17T03:00:49+5:30
नोटाबंदीदरम्यान कर चुकवेगिरी करून रक्कम मोठ्या प्रमाणात जवळ बाळगणाऱ्या लोकांवर आयकर विभागाची लवकरच कारवाई होणार आहे.
मूल्यांकन प्रक्रिया : कारवाई होणार
राघवेंद्र तिवारी नागपूर
नोटाबंदीदरम्यान कर चुकवेगिरी करून रक्कम मोठ्या प्रमाणात जवळ बाळगणाऱ्या लोकांवर आयकर विभागाची लवकरच कारवाई होणार आहे. यासाठी विभागाची तयारी जोरात सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
८ नोव्हेंबर २०१६ ला नोटाबंदी केल्यानंतर सरकारने पाचशे आणि हजाराच्या जुन्या नोटा ३० डिसेंबर २०१६ पर्यंत बदलविण्याची आणि बँकेत जमा करण्याची मुदत दिली होती. लोकांनी बँकांमधील मोठ्या रांगांमध्ये उभे राहून रक्कम जमा केली होती. अनेकांनी दुसऱ्याच्या खात्यात जुन्या नोटा जमा केल्याचा संशय आयकर विभागाला आहे. अशा प्रकारे विदर्भात दुसऱ्याच्या खात्यात जवळपास १२०० कोटींची रक्कम जमा झाल्याची माहिती आहे. ही रक्कम कर चुकवेगिरी करणाऱ्यांची असल्याचा विभागाचा अंदाज आहे. करचोरी करून रक्कम जवळच ठेवणाऱ्यांविरुद्ध सरकार कारवाई करणार असल्याची माहिती आयकर विभागाच्या एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली. जुन्या नोटा बदलविण्याची मुदत संपल्यानंतर आयकर विभागाने कर चुकवेगिरी करणाऱ्यांचा शोध सुरू केला आहे. या प्रक्रियेत विभाग खासगी, सहकारी व राष्ट्रीयकृत बँका आणि पोस्ट कार्यालयातून आकडे गोळा करीत आहे.
सरकारने अर्थसंकल्पात आयकरचा टप्पा वाढून लोकांना सवलत दिली आहे, तर दुसरीकडे मोठ्या कर चुकवेगिरी करणाऱ्यांवर नियंत्रण आणत आहे. या प्रक्रियेला सहा महिन्यांचा कालावधी लागणार आहे. त्यानंतरच करचोरांवर कारवाई होऊ शकते.