टी-२० साठी १२०० पोलिसांचा बंदोबस्त

By admin | Published: January 25, 2017 02:57 AM2017-01-25T02:57:17+5:302017-01-25T02:57:17+5:30

भारत आणि इंग्लंडदरम्यान येथील जामठा स्टेडियमवर खेळला जाणाऱ्या टी-२० सामन्याला कसलाही धोका नाही

1200 police custody for T20 | टी-२० साठी १२०० पोलिसांचा बंदोबस्त

टी-२० साठी १२०० पोलिसांचा बंदोबस्त

Next

 भारत-इंग्लंड सामना रविवारी :
जामठ्यात राहणार कडेकोट सुरक्षा व्यवस्था

नागपूर : भारत आणि इंग्लंडदरम्यान येथील जामठा स्टेडियमवर खेळला जाणाऱ्या टी-२० सामन्याला कसलाही धोका नाही किंवा कुण्या दहशतवादी संघटनांचा इशाराही नाही. मात्र, पोलिसांनी सुरक्षेसाठी आवश्यक ती सर्व खबरदारी घेतली आहे. सामन्याच्या निमित्ताने ४ पोलीस उपायुक्तांसह १२०० पोलिसांचा ताफा नियुक्त करण्यात आला आहे, अशी माहिती गुन्हे शाखेचे प्रभारी अतिरिक्त पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी पत्रकारांना दिली.
शर्मा यांनी पोलीस आयुक्तालयात आयोजित पत्रकार परिषदेत आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्याच्या बंदोबस्ताची पत्रकारांना माहिती दिली. यावेळी परिमंडळ १ च्या उपायुक्त दीपाली मासिरकर, वाहतूक शाखेच्या उपायुक्त स्मार्तना पाटील आणि विशेष शाखेचे उपायुक्त रवींद्रसिंग परदेसी उपस्थित होते.
जामठ्यावर क्रिकेट सामना असला की नागपूर-वर्धा-चंद्रपूर मार्गावरची वाहतूक विस्कळीत होते. परिणामी नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतो. हा अनुभव लक्षात घेता, यावेळी पोलिसांनी वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. त्यानुसार सामना सुरू होण्याच्या दोन तासांपूर्वीपासूनच या मार्गावरची वाहतूक हिंगणा मार्गावरून वळविण्यात येणार आहे. सामना बघण्यासाठी येणारे अतिमहत्त्वाचे आणि महत्त्वाचे व्यक्ती, व्हीसीएचे पदाधिकारी आणि कर्मचारी, बंदोबस्तावरील पोलीस अधिकारी, कर्मचारी, प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी आणि प्रेक्षक या सर्वांसाठी वेगवेगळी पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. गर्दी होऊ नये म्हणून दुपारी ३ वाजताच प्रवेशद्वार उघडून प्रेक्षकांना प्रवेश दिला जाणार आहे. सुरक्षेच्या अनुषंगाने हेल्मेट, खाण्यापिण्याच्या चीजवस्तू किंवा पाण्याची बॉटल आतमध्ये नेता येणार नाही. घातपातासाठी द्रवरूपातील स्फोटकाचा वापर केला जातो. ही स्फोटके पाण्यासारखीच दिसतात. प्रत्येकाची पाण्याची बॉटल तपासणे शक्य होणार नाही, म्हणून पाण्याची बॉटल आत नेण्यास परवानगी नसल्याचे सांगून प्रेक्षकांना व्हीसीएतर्फे पाण्याचे मोफत पाऊच दिले जाणार आहे, असेही शर्मा यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

४४ हजार रसिकांची अपेक्षा
जामठा स्टेडियमची प्रेक्षक क्षमता ४४, ५०० एवढी आहे. सामना चुरशीचा होणार, हे ध्यानात घेता स्टेडियम (सामना) हाऊसफुल्ल होईल, असा पोलिसांचा अंदाज आहे. नागपूर शहराबाहेर स्टेडियम असल्याने बहुतांश प्रेक्षक आपली वाहने नेतील. वर्धा मार्गावर मेट्रोच्या कामाच्या निमित्ताने जागोजागी खड्डे आहेत. रस्ता अरुंद असल्याने ठिकठिकाणी वाहतूक रखडण्याची भीती आहे. त्याचमुळे वाहतूक हिंगणा, एमआयडीसी मार्गे वळविण्यात आली असून, एकाच ठिकाणी चार हजार वाहने राहतील, अशी व्यवस्था जामठ्याच्या बाजूला असलेल्या शाळेच्या समोर करण्यात आल्याचे शर्मा यांनी सांगितले. वाहतुकीच्या समस्येसोबतच कसल्याही प्रकारच्या सुरक्षेची समस्या उद्भवू नये म्हणून, ४ पोलीस उपायुक्त, १० सहायक आयुक्त, १५० पोलीस उपनिरीक्षक ते निरीक्षक आणि १००० पोलीस कर्मचारी बंदोबस्ताची धुरा सांभाळणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पैशासाठी घासाघीस
विदर्भ क्रिकेट असोसिएशन (व्हीसीए) प्रत्येक सामन्याच्या वेळी पोलिसांकडून सुरक्षा व्यवस्था घेते. आतापर्यंत शहर आणि ग्रामीण अशा दोन्ही पोलिसांचा बंदोबस्त व्हीसीए मागत होती. मात्र सामना झाल्यानंतर सुरक्षा शुल्क देण्यास टाळाटाळ करीत असल्याने पोलिसांची व्हीसीएकडे लाखोंची थकबाकी आहे. २०१० पासून शहर पोलिसांचे दीड ते पावणेदोन कोटी रुपये व्हीसीएने दिलेले नाही. घासाघीस करीत असल्याने यावेळी पोलिसांनी रक्कम वसुलीसाठी आधीपासूनच बोलणी चालवली आहे.

Web Title: 1200 police custody for T20

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.