१२०० वर्षांपूर्वीची ऐतिहासिक कपूर बावडी मोजतेय अखेरच्या घटका!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2022 02:18 PM2022-04-11T14:18:49+5:302022-04-11T14:30:46+5:30
भारतामध्ये ज्या प्रसिद्ध बावड्या आहेत, त्यात कपूर बावडीचा समावेश आहे.
राहुल पेटकर
रामटेक (जि. नागपूर) : रामटेक शहराला ऐतिहासिक वारसा आहे. येथे इतिहासाकालीन अनेक वास्तू अजूनही उभ्या आहेत. परंतु, प्रशासनाच्या उदासीन धाेरणामुळे हा ठेवा नष्ट हाेण्याच्या उंबरठ्यावर आहे. यामध्ये १२०० वर्षांपूर्वी बांधण्यात आलेली कपूर बावडीही आहे.
रामटेकमध्ये पूर्वी पानमळे माेठ्या प्रमाणात हाेते. त्यासाठी विहिरी बांधण्यात आल्या होत्या तर काही ठिकाणी बावड्याही बांधण्यात आल्या होत्या. तलावाची निर्मिती केली. रामटेकचे पान प्रसिद्ध असल्याने व मागणी जास्त असल्याने हा व्यवसाय भरभराटीस आला. बारई समाज हा व्यवसाय करायचा. पुढे नैसर्गिक संकटे आली. नवीन पिढीचे या व्यवसायाकडे दुर्लक्ष झाले. त्यामुळे विहिरी आणि बावड्यांकडे कुणीही लक्ष दिले नाही.
रामटेक शहरात आजही १५ ते २०च्या आसपास विहिरी व बावड्या आहेत. यातील बहुतेक पुरातन विहिरी बुजल्या आहेत. काही बावड्या आजही चांगल्या स्थितीत आहेत. रामटेकमध्ये कपूर बावडी, सिंदुर बावडी, कुमारी बावडी, सीतेची नान्ही, रामाळेश्वर बावडी, रामतलाई बावडी यासह अनेक बावड्या अजूनही अस्तित्वात आहेत.
भारतामध्ये ज्या प्रसिद्ध बावड्या आहेत, त्यात कपूर बावडीचा समावेश आहे. ही बावडी जैन मंदिराच्या मागील भागात आहे. या बावडीची निर्मिती ही १२०० वर्षांपूर्वीची आहे. या बावडीला भरपूर पाणी आहे. यामधून निघणारे पाणी जमा करण्यासाठी एक तलाव बनविण्यात आला होता. त्याद्वारे शेतीला पाणी पुरवठा व मच्छीपालन केले जायचे.
अशी आहे कपूर बावडी
विदर्भात कलचुरी नावाचे राजे हाेऊन गेले. त्यांनी कपूर बावडीची निर्मिती केली. त्याच्याच नावावरून हे नाव पडले. कपूर बावडीमध्ये चामुंडा, इंगलाज, काली, रणचंडी, कपुरता या देवींचे मंदिर आहे. कुमारी बावडीमध्येही देवीचे मंदिर आहे. या बावडीची नागरिकांनी दुरुस्ती केली आहे.
हेमाडपंथी बांधकामाचा उत्कृष्ट नमुना
कपूर बावडी ही हेमाडपंथी बांधकामाचा उत्कृष्ट नमुना आहे. या बावडीच्या कळसाचे दगड खचले आहेत. याच्या संवर्धनासाठी पुरातत्व विभागाकडे निधी नाही आणि जिल्हा प्रशासनाकडे वेळ नाही.
गडावरील बावडी पुरातन विभागाकडे
रामटेकच्या गडावर जी बावडी आहे. तिला लाेपमुद्रा (अगस्ती मुनींची पत्नी) नावाने ओळखले जाते. या बावडीचा ताबा सध्या पुरातत्त्व विभागाकडे आहे. पण तिची दुरुस्ती एकदाही करण्यात आली नाही. गाळामुळे या बावड्या बुजल्या आहेत. पण गाळ काढला जात नाही.
नागरिकांनी घेतला पुढाकार
रामटेकमध्ये दिवंगत मंत्री मधुकर किंमतकर यांच्या घरामागे एक बावडी आहे. त्यावर नागरिकांनी जाळी बसविली आहे. अशा विविध विहिरी व बावड्या अजूनही संवर्धनापासून वंचित आहेत. नेहरू मैदानातील विहिरीचे पाणी अजूनही मानापूर गावाची तहान भागवत आहे. तहसीलसमाेर एक माेठी विहीर आहे, ती कधीच आटत नाही. रामटेकला पाणीपुरवठा करू शकते. पण या विहिरीचा गाळ काढला जात नाही. नळयाेजना आल्यामुळे विहिरीचे महत्त्व कमी झाले.