डॉ. आंबेडकरांच्या शाळा प्रवेशाला १२१ वर्षे; महामानवांच्या आठवणींना उजाळा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2021 07:13 AM2021-11-08T07:13:27+5:302021-11-08T07:13:46+5:30
डॉ. आंबेडकरांनी ज्ञानाच्या जोरावरच भारतीय समाजात क्रांती घडविली.
सातारा : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार व वंचितांचे उद्धारकर्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शालेय शिक्षणाचा पाया ऐतिहासिक सातारा नगरीत रोवला गेला होता. त्यांनी ७ नोव्हेंबर १९०० रोजी तत्कालीन गव्हर्नमेंट (प्रतापसिंह) हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला. या घटनेला १२१ वर्षे पूर्ण होत असून बाबासाहेबांचा शाळा प्रवेश दिन रविवारी राज्यभरात विद्यार्थी दिवस म्हणून विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.
डॉ. आंबेडकरांनी ज्ञानाच्या जोरावरच भारतीय समाजात क्रांती घडविली. भारतीय राज्य घटनेचे ते शिल्पकार ठरले. बाबासाहेबांना लहानपणी भिवा म्हणत. शाळेच्या त्या वेळच्या रजिस्टरमध्ये १९१४ क्रमांकासमोर भिवा रामजी आंबेडकर हे नाव व त्यासमोर बाबासाहेबांची स्वाक्षरी असून, हा दस्तऐवज शाळेने जपून ठेवला आहे. या शाळेत बाबासाहेबांनी चौथीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. डॉ. आंबेडकरांचा शाळा प्रवेश दिन विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करावा, अशी मागणी साताऱ्यातील अरुण जावळे यांनी शासनाकडे केली होती. १७ ऑक्टोबर २०१७ रोजी अध्यादेश काढून ७ नोव्हेंबर हा विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करण्याचे सरकारने आदेश दिले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळा प्रवेश दिन राज्यभर विद्यार्थी दिवस म्हणून साजरा होत आहे. परंतु हा दिवस राज्यात नव्हे तर देशात साजरा व्हायला हवा. या मागणीची राष्ट्रपती व पंतप्रधानांना सव्वा लाख पत्र पाठविली जाणार असून, आतापर्यंत ५० हजार पत्र पाठविली आहेत. युवा पिढीत बाबासाहेबांचे विचार रुजविण्यासाठी, ती समृद्ध व बलशाली बनविण्यासाठी त्यांच्यात शैक्षिक नीतीमूल्ये जागृत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे.
- अरुण जावळे, प्रवर्तक, विद्यार्थी दिवस
राज्यपाल गणपतराव तपासे मार्गावरील प्रतापसिंह शेती शाळेच्या जागेत महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने आंतरराष्ट्रीय दर्जाचे शेती संशोधन केंद्र व्हावे. शासनाने प्रतापसिंह हायस्कूलला आंतरराष्ट्रीय शाळेचा दर्जा देऊन ही शाळा राज्य शासनाने चालवावी, अशी आमची मागणी आहे.
- गणेश दुबळे, अध्यक्ष, प्रतापसिंह हायस्कूल विकास समिती, सातारा