मोबाइल चोरून ‘फोन पे’च्या माध्यमातून १.२२ लाखांचा गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2022 08:11 PM2022-08-26T20:11:00+5:302022-08-26T20:11:27+5:30
Nagpur News एका सुरक्षारक्षकाचा मोबाइल चोरून त्यातील ‘फोन पे’ ॲपच्या माध्यमातून त्याला १.२२ लाखांचा गंडा घातल्याची बाब समोर आली आहे. या प्रकरणात अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
नागपूर : एका सुरक्षारक्षकाचा मोबाइल चोरून त्यातील ‘फोन पे’ ॲपच्या माध्यमातून त्याला १.२२ लाखांचा गंडा घातल्याची बाब समोर आली आहे. या प्रकरणात अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
विजयकुमार प्रदीपकुमार सिंग (३२) हे गवसी मानापूर येथील एका गोडावूनमध्ये सुरक्षारक्षक म्हणून तैनात आहेत. मूळचे उत्तर प्रदेशातील मिर्झापूर येथील असलेले सिंग हे मोबाइलमधील ‘फोन पे’ ॲपच्या माध्यमातून वडिलांना पैसे पाठवायचे. त्यांच्या ॲपला कुठलेही ‘पॅटर्न लॉक’ नव्हते व पिन एका डायरीत लिहून ठेवला होता. दि. १५ जुलै रोजी त्यांचा फोन अज्ञात चोराने चोरून नेला. दि. १५ जुलै ते दि. १९ जुलै या कालावधीत अज्ञात चोराने फोन पेच्या माध्यमातून त्यांच्या आयबीपीएस व इंडियन बॅंकेच्या खात्यातून १.१५ लाख रुपयांची रक्कम दुसऱ्या खात्यात वळती केली. सिंग ज्यावेळी बॅंकेत गेले होते, तेव्हा त्यांना हा प्रकार कळाला. त्यांनी हिंगणा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, तपास सुरू आहे.