नागपूर विमानतळावर १.२३६ किलो सोने जप्त; अंतर्वस्त्रात लपवून आणले ‘पेस्ट’चे दोन पॅकेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2023 07:58 PM2023-01-10T19:58:53+5:302023-01-10T20:13:54+5:30

Nagpur News कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी सकाळी नागपुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर मुंबईहून आलेल्या प्रवाशांकडून ‘पेस्ट’ स्वरूपातील ६८.६० लाख रुपये किमतीचे १.२३६ किलो सोने जप्त केले.

1.236 kg gold seized at Nagpur airport; Two packets of 'paste' were hidden in underwear | नागपूर विमानतळावर १.२३६ किलो सोने जप्त; अंतर्वस्त्रात लपवून आणले ‘पेस्ट’चे दोन पॅकेट

नागपूर विमानतळावर १.२३६ किलो सोने जप्त; अंतर्वस्त्रात लपवून आणले ‘पेस्ट’चे दोन पॅकेट

Next
ठळक मुद्देमुंबईहून आला आरोपी

 

नागपूर : कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी सकाळी नागपुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर मुंबईहून आलेल्या प्रवाशांकडून ‘पेस्ट’ स्वरूपातील ६८.६० लाख रुपये किमतीचे १.२३६ किलो सोने जप्त केले. विभागाच्या अधिकाऱ्यांनी गुप्त माहितीच्या आधारे कारवाई केली असून, आरोपीची चौकशी सुरू आहे.

अब्दुल रकीब (वय २५) असे आरोपीचे नाव असून, तो मूळचा कर्नाटकचा, तर सध्या मीरा रोड, मुंबई येथील रहिवासी आहे. गो एअर कंपनीच्या जी८-२६०१ विमानाने सकाळी ८.०५ वाजता तो मुंबईहून नागपूरला आला होता. चौकशीदरम्यान त्याच्याकडे तीन नावाचे तीन आधार कार्ड आढळून आले. प्रारंभी सोने विदेशातून मुंबईत आले आणि तेथून मी नागपुरात आणले. नागपुरात एका व्यक्तीकडे सुपू्ूर्द करणार होतो. मुंबईत सोने कुणी दिले आणि नागपुरात कुणाला द्यायचे होते, यांची नावे माहीत नसल्याचे त्याने सांगितले.

केंद्रीय जीएसटी विभागाचे आयुक्त अभयकुमार म्हणाले, आरोपी नागपूर विमानतळावर उतरल्यानंतर कस्टमच्या अधिकाऱ्यांनी चौकशीसाठी त्याला ताब्यात घेतले. तपासणीदरम्यान प्लास्टिकचे आवरण असलेले दोन पॅकेट अंतर्वस्त्रात लपविलेले आढळले. या दोन्ही पॅकेटमधील सोन्याचे एकूण वजन १.२३६ किलो आहे. त्याच्या मोबाइलमध्ये सकाळच्या दोन काॅलची नोंद होती. एका तासानंतर त्याच्याच मोबाइलवरून संबंधित क्रमांकावर फोन केला असता दोन्ही स्वीच ऑफ होते. चौकशीनंतर त्याला विमानतळाबाहेर आणले; पण त्याला भेटणारा कुणीही दिसला नाही. त्यामुळे त्याला चौकशीसाठी कस्टम कार्यालयात आणण्यात आले. तो तस्करीचा माल दुसऱ्यापर्यंत पोहोचून देणारा आहे. त्याला पहिल्यांदाच पकडण्यात आले आहे. कारवाईदरम्यान सीआयएसएफ अधिकाऱ्यांनी मोलाची मदत केली.

आता घरगुती विमानातून होऊ लागली सोन्याची तस्करी

आयातीत सोन्यावरील कस्टम ड्युटी वाचविण्यासाठी आता विदेशातून आणलेल्या सोन्याची तस्करी देशांतर्गत विमान सेवेद्वारे होऊ लागली आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय आणि घरगुती विमानातील प्रवाशांवर विभाग लक्ष ठेवून आहे. कस्टम विभाग आर्थिकतेचा कणा असून, अशा घटना पुन्हा होऊ नये म्हणून विभाग दक्ष आहे. गेल्यावर्षी नागपूर विमानतळावर तीन घटनांमध्ये ५ कोटी किमतीचे जवळपास १० किलो सोने पकडले होते. हे सोने रिझर्व्ह बँकेला विकण्यात आले आणि त्यातून मिळालेले ५ कोटी रुपये सरकारच्या खात्यात जमा करण्यात आले.

ही कारवाई केंद्रीय जीएसटी नागपूर विभागाचे प्रधान मुख्य आयुक्त रामचंद्र सांखला यांच्या नेतृत्वात आणि आयुक्त अभयकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली नागपूर कस्टम्सचे एअर इंटेलिजन्स युनिटचे अतिरिक्त आयुक्त पीयूष भाटी, अधीक्षक विजय सुंदर, दीपक सोनटक्के, अविनाश पराते यांनी केली.

Web Title: 1.236 kg gold seized at Nagpur airport; Two packets of 'paste' were hidden in underwear

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.