१२,३७० केशरी कार्ड धारकांना सवलतीच्या दरात धान्य मिळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:08 AM2021-05-29T04:08:21+5:302021-05-29T04:08:21+5:30
कोंढाळी : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात आलेल्या लॉकडाऊनचा सर्वाधिक फटका सर्वसामान्य नागरिकांना बसला आहे. राज्य शासनाने जून महिन्यापासून राज्यातील सर्व ...
कोंढाळी : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात आलेल्या लॉकडाऊनचा सर्वाधिक फटका सर्वसामान्य नागरिकांना बसला आहे. राज्य शासनाने जून महिन्यापासून राज्यातील सर्व केशरी कार्ड धारकांना सवलतीच्या दरात धान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे काटोल-नरखेड तालुक्यातील १२,३७० केशरी कार्ड धारकांना लाभ मिळणार आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने लॉकडाऊन जाहीर केला आहे. तो कधी हटेल याबाबत अद्यापही साशंकता आहे. यामुळे सामान्य नागरिकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. शासनाने अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत व शेतकरी योजनेत समाविष्ट असलेल्या कार्डधारकांना मोफत गहू, तांदूळ धान्य देत आहे. पण केशरी रेशनकार्ड धारकांना या योजनेत धान्य मिळत नव्हते. राज्य शासनाने सर्व केशरीकार्ड धारकांना जून महिन्यात सवलतीच्या दरात धान्य देण्याचा निर्णय घेतला. काटोल तालुक्यात ७, ७७० व नरखेड तालुक्यात ४,६०० केशरीकार्ड धारक आहे. या केशरीकार्ड धारकांना योजनेचा लाभ मिळणार आहे. या केशरीकार्ड धारकांना प्रति व्यक्ती एक किलो गहू व एक किलो तांदूळ मिळणार आहे. या लोकांना ८ रुपये किलो दराने गहू व १२ रुपये किलो दराने तांदूळ मिळणार आहे. काटोल व नरखेड तालुक्यातील केशरीकार्ड धारकांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे अवाहन उपविभागीय अधिकारी श्रीकांत उबरकर, काटोलचे तहसीलदार अजय चरडे, नरखेडचे तहसीलदार जाधव व काटोल-नरखेड तालुक्याचे अन्नपुरवठा अधिकारी कमलेश कुंभरे यांनी केले आहे.