१२४ गावाचा कारभार ३२ कर्मचाऱ्यांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:08 AM2021-03-21T04:08:11+5:302021-03-21T04:08:11+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क माैदा : शेतकरी व शेतीच्या दृष्टीने तालुका कृषी अधिकारी कार्यालयाला विशेष महत्त्व आहे. मात्र, माैदा शहरातील ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
माैदा : शेतकरी व शेतीच्या दृष्टीने तालुका कृषी अधिकारी कार्यालयाला विशेष महत्त्व आहे. मात्र, माैदा शहरातील तालुका कृषी अधिकारी कार्यालयाला लागलेले रिक्त पदांचे ग्रहण काही केल्या सुटायला तयार नाही. या तालुक्यात एकूण १२४ गावे असून, प्रत्येक गावात शेतकऱ्यांचे वास्तव्य आहे. मात्र, येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालयात एकूण ५० पदे मंजूर असून, त्यातील १८ पदे रिक्त आहेत. त्यामुळे ३२ कर्मचाऱ्यांना संपूर्ण तालुक्याचा कारभार सांभाळताना कसरत करावी लागत आहे. दुसरीकडे, शासनाच्या उदासीन धाेरणामुळे ही रिक्त पदे वर्षानुवर्षे भरली जात नाही, असा आराेप शेतकऱ्यांनी केला आहे.
एकूण १२४ गावाचा व्याप सांभाळणाऱ्या माैदा येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालयात तालुका कृषी अधिकाऱ्याचे महत्त्वाचे पद काही वर्षापासून रिक्त आहे. या कार्यालयात मंडळ कृषी अधिकाऱ्यांच्या तीनपैकी एक पद रिक्त असून, कृषी पर्यवेक्षकांचे पाचपैकी एक पद, कृषी सहायकांचे २५ पैकी ७ पदे, अनुरेखकांचे चारपैकी चार पदे, लिपिकांचे चारपैकी एक पद तर शिपायांचे पाचपैकी तीन पदे रिक्त आहेत. या कार्यालयात सहायक अधीक्षक, वरिष्ठ लिपिक व वाहन चालकाचे प्रत्येकी एक पद मंजूर असून, ही तिन्ही पदे भरलेली आहेत.
केंद्र व राज्य शासनाच्या वतीने शेतकऱ्यांसाठी विविध याेजना राबविल्या जातात. कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना शासकीय याेजनांची माहितीच मिळत नाही. त्यामुळे त्यांना शासनाच्या याेजनांच्या लाभापासून वंचित राहावे लागते. कृषी क्षेत्रात दिवसेंदिवस आमूलाग्र बदल हाेत असून, कर्मचाऱ्यांअभावी शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाने विकसित केलेली बियाणे, खते, औषधे, पिकांच्या पेरणीसह मशागतीची बदललेली पद्धती यासह अन्य महत्त्वाच्या बाबींची माहितीच मिळत नाही. या रिक्त पदांमुळे तसेच शासनाच्या उदासीन धाेरणामुळे कर्मचाऱ्यांचे कमी आणि शेतकऱ्यांचे अधिक नुकसान हाेत असल्याने, ही रिक्त पदे तातडीने भरण्याची मागणीही तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली आहे.
...
मार्गदर्शनाअभावी शेतकऱ्यांचे नुकसान
संपूर्ण तालुक्यात शेतकऱ्यांची संख्या ८० टक्क्यांपेक्षा अधिक आहे. ‘राईस बेल्ट’ अशी या तालुक्याची विदर्भात ओळख आहे. धानाची शेती अतिशय श्रमाची असून, अलीकडच्या काळात तुडतुड्यासारख्या साध्या किडीमुळे धानाचे पीक नष्ट हाेत असून, प्रसंगी शेतकऱ्यांना ते कापून मळणी करण्याऐवजी शेतातच जाळावे लागते. अशा विपरीत परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना वेळावेळी याेग्य मार्गदर्शनाची आवश्यकता असते. वेळीच मार्गदर्शन मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे नुकसानही हाेते.
...
अतिरिक्त प्रभार
माैदा तालुक्यातील ही १२४ गावे ६१ ग्रामपंचायतींतर्गत विभागली आहेत. माैदा येथील तालुका कृषी अधिकारी रविकांत वासनिक मागील वर्षी सेवानिवृत्त झाले. त्यानंतर त्यांचा प्रभार याच कार्यालयातील मंडळ कृषी अधिकारी संदीप नाकाडे यांच्याकडे साेपविण्यात आला. त्यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांना दुहेेरी जबाबदारी सांभाळावी लागत असल्याने त्यांची फरफट हाेत आहे. शेतकऱ्यांची वेळेवर कामे हाेत नसल्याने, या कर्मचाऱ्यांना प्रसंगी राेषालाही सामाेरे जावे लागते.