नागपूरनजिक १२५ हेक्टर जंगलात अग्नितांडव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2019 09:58 AM2019-05-27T09:58:38+5:302019-05-27T10:02:43+5:30

अंबाझरी राखीव जंगलाला रविवारी मध्यरात्री १.४० वाजता अज्ञात समाजकंटकांनी लावलेल्या आगीत १२५.४० हेक्टर परिसर जंगल खाक झाले.

125 hectare forest cought in fire near Nagpur | नागपूरनजिक १२५ हेक्टर जंगलात अग्नितांडव

नागपूरनजिक १२५ हेक्टर जंगलात अग्नितांडव

Next
ठळक मुद्देअंबाझरी राखीव क्षेत्रातील गवत कुरण खाकअग्निशमनच्या सहा गाड्यांद्वारे नियंत्रणवन विभागाने केली समिती गठितसुदैवाने झाडे, पशुपक्ष्यांची हानी नाही

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अंबाझरी राखीव जंगलाला रविवारी मध्यरात्री १.४० वाजता अज्ञात समाजकंटकांनी लावलेल्या आगीत १२५.४० हेक्टर परिसर जंगल खाक झाले. या भागात गवत कुरण असल्यामुळे आणि गवत ४ ते ५ फूट उंच वाढलेले असल्यामुळे पाहता-पाहता आगीने रौद्ररुप धारण केले. आगीची सूचना मिळताच वन विभागाचे अधिकारी, पोलीस घटनास्थळी पोहोचले. अग्निशमन विभागाच्या ६ गाड्यांनी आगीवर नियंत्रण मिळविले. या प्रकरणी अंबाझरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून वन विभागाने चौकशी समिती गठित केली आहे.
हिंगणा वन परिक्षेत्रात शहरी वनाचा भाग असलेल्या अंबाझरी वन क्षेत्रात रविवारी रात्री अज्ञात समाजकंटकाने आग लावली. रात्रपाळीच्या चौकीदाराने हिंगणाचे वन परिक्षेत्र अधिकारी आशिष निनावे यांना वाडीच्या कमलानगर भागात आग लागल्याची माहिती दिली. या भागात गवत कुरण आहे. गवत ४ ते ५ फूट वाढले आहे. गवत असल्यामुळे आग झपाट्याने पसरली. आगीचे रौद्र रुप पाहून पोलीस नियंत्रण कक्षाला सूचना देण्यात आली. सहायक पोलीस आयुक्त सिद्धार्थ शिंदे, गुन्हे शाखेचे निरीक्षक आर. डी. निकम, एमआयडीसीचे उपनिरीक्षक एन. ए. मदनकर, हिंगणाचे वन परिक्षेत्र अधिकारी आशिष निनावे, सेमिनरी हिल्सचे वन परिक्षेत्र अधिकारी विजय गंगावणे कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले. आग लागलेल्या वन क्षेत्राच्या सभोवताल संरक्षण भिंत तयार करण्यात आली आहे. त्यामुळे अवैध चराई बंद असून गवत ४ ते ५ फुट उंच वाढले आहे. सहायक पोलीस आयुक्त शिंदे यांनी अग्निशमन विभागाला पाचारण केले. विभागाच्या ६ गाड्या आग विझविण्याच्या कामाला लागल्या. नरेंद्रनगर अग्निशमन विभागाचे स्टेशन आॅफिसर डी. एन. नाकोड घटनास्थळी पोहोचले. युद्ध स्तरावर आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम हाती घेण्यात आले. अखेर सकाळी ६ वाजता आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. परंतु तो पर्यंत १२५.४० हेक्टरचे गवत कुरण जळुन खाक झाले होते. घटनेची दखल वनबल प्रमुख व प्रधान मुख्य वनसंरक्षक उमेश अग्रवाल, अप्पर प्रधान मुख्य वन संरक्षक हुडा, मुख्य वन संरक्षक कल्याण कुमार, उपवन संरक्षक प्रभू नाथ शुक्ला यांनी घेतली. अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळाला भेट देऊन याबाबत अंबाझरी ठाण्यात गुन्हा दाखल केला. या भागात संरक्षणात्मक उपाययोजना करण्याचे आदेश हिंगण्याचे वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

सर्वांच्या मेहनतीमुळे आगीवर नियंत्रण
आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी सहायक पोलीस आयुक्त सिद्धार्थ शिंदे यांनी १५ पोलिसांचा ताफा, हिंगणा वन परिक्षेत्रातील १३ वन कर्मचारी, २ ब्लोअर मशीन, सेमिनरी हिल्सचे वन परिक्षेत्र अधिकारी आणि त्यांचे ६ संरक्षण मजूर, अग्निशमन दलाच्या ६ गाड्या, मेट्रो अंतर्गत रोपवनाचे ६ मजूर यांनी तातडीने कार्यवाही केली. सर्वांनी केलेल्या सामूहिक प्रयत्नामुळे आग अवघ्या चार तासात आटोक्यात आणणे शक्य झाले.
आग लागलेल्या अंबाझरीच्या राखीव जंगलाच्या भागात गवत कुरण होते. या परिसरात मोठी झाडे, पशु-पक्षी यांचे नुकसान झाले नसल्याची माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. वन विभागाने वृक्षारोपण केलेला भाग दुसऱ्या परिसरात असल्यामुळे वृक्षारोपण केलेल्या परिसरात आगीचा कुठलाही परिणाम झाला नाही.

आगीची चौकशी करू
अंबाझरी राखीव जंगलात समाजकंटकाने आग लावल्यामुळे १२५.४० हेक्टरचे वन परिक्षेत्र जळाले आहे. या भागात गवत कुरण असल्यामुळे मोठ्या झाडांचे नुकसान झाले नाही. आगीची चौकशी करण्यासाठी वन विभागाने समिती गठित केली आहे. याशिवाय अंबाझरी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
-आशिष निनावे, वन परिक्षेत्र अधिकारी, हिंगणा

जॉगर्स पार्क, गार्डनसाठी लावली आग?
वाडी भागातील काही लोकप्रतिनिधींना अंबाझरी राखीव जंगलातील गवत कुरण असलेल्या भागात जॉगर्स पार्क, गार्डन बनवायचे आहे. हे संरक्षित जंगल असल्यामुळे त्यांना यात अडथळे येत आहेत. त्यामुळे ही आग लावण्यात आली असल्याचा आरोप आहे. गार्डन बनविले की आम्ही फिरत राहू आणि आग लागणार नाही, असा युक्तिवाद या प्रतिनिधींचा आहे.

Web Title: 125 hectare forest cought in fire near Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :fireआग