किसान रेल्वेमुळे मिळाला १.२८ कोटी महसूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:10 AM2020-12-31T04:10:59+5:302020-12-31T04:10:59+5:30
३ हजार ७०० टनापेक्षा अधिक कृषी मालाची निर्यात नागपूर : शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेल्या किसान रेल्वेमुळे मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाला ...
३ हजार ७०० टनापेक्षा अधिक कृषी मालाची निर्यात
नागपूर : शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेल्या किसान रेल्वेमुळे मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाला चांगलाच फायदा झाला आहे. दोन महिन्यात विभागाला १ कोटी २८ लाखाचा महसूल मिळाला. तर किसान रेल्वेच्या माध्यमातून नागपूर जिल्ह्यातून ३ हजार ७७९ टन कृषी मालाची निर्यात करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांचा शेतमाल एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी पोहोचविण्यासाठी आतापर्यंत ट्रकचा वापर करण्यात येत होता. फळे, भाजीपाला आणि दूध ट्रकच्या माध्यमातून दूर अंतरावर पोहोचविण्यात येत होते. परंतु केंद्र शासनाने ऑगस्ट महिन्यापासून देशभरात किसान रेल्वेचा शुभारंभ केला. यात २१ नोव्हेंबरपासून नागपूर मार्गे ११ किसान रेल्वे चालविण्यात आल्या. या गाड्या नागपूरवरून हावडाच्या दिशेने रवाना झाल्या. किसान रेल्वेत डाळिंब, संत्रा, भाजीपाला पाठविण्यात आला. नरखेड, पांढुर्णा, काटोल, सावनेर, वर्धा, सेवाग्राम, सेलू आदी ठिकाणच्या शेतकऱ्यांनी किसान रेल्वेचा लाभ घेतला. या गाड्यांमुळे मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाला चांगला महसूल मिळाला.
..............
किसान रेल्वेमुळे असा मिळाला महसूल
नागपूर रेल्वेस्थानकावरून जाणाऱ्या किसान रेल्वेच्या पहिल्या फेरीनंतर किसान रेल्वेची लोकप्रियता वाढली. यात २१ नोव्हेंबरला नागपूर रेल्वेने पाठविण्यात आलेल्या शेतमालाद्वारे ५.६४ लाख, २४ नोव्हेंबरला ८.३९ लाख, २८ नोव्हेंबरला १२.०८ लाख, १ डिसेंबरला ९.६८ लाख, ५ डिसेंबरला ११.२० लाख, ८ डिसेंबरला ११.३७ लाख, १२ डिसेंबरला १२.६६ लाख, १५ डिसेंबरला १२.२८ लाख, १९ डिसेंबरला १४.३९ लाख, २२ डिसेंबरला १५.६९ लाख आणि २८ डिसेंबरला १४.६१ लाखाचा महसूल विभागाला मिळाला आहे.
...........