नागपूर विभागात डेंग्यूचे १२८ रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 08:34 PM2018-08-21T20:34:28+5:302018-08-21T20:35:27+5:30

डेंग्यूसदृश तापाने नागपूर जिल्हा फणफणला आहे. सहा जिल्ह्यांच्या नागपूर विभागात आतापर्यंत १२८ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले असून सर्वाधिक नोंद नागपूर जिल्ह्यात झाली आहे. यात महानगरपालिकेच्या हद्दीत ४६ तर नागपूर ग्रामीण भागात १६ असे एकूण ६२ रुग्ण आढळून आले आहेत. विशेष म्हणजे, १७ आॅगस्ट रोजी खात येथील १७ वर्षीय मुलीचा तर २० आॅगस्ट रोजी वाडी येथील ५७ वर्षीय इसमाचा डेंग्यू संशयित म्हणून मृत्यू झाल्याने डेंग्यूला घेऊन भीतीचे वातावरण आहे.

128 patients of Dengue in Nagpur division | नागपूर विभागात डेंग्यूचे १२८ रुग्ण

नागपूर विभागात डेंग्यूचे १२८ रुग्ण

Next
ठळक मुद्देसर्वाधिक रुग्ण नागपूर जिल्ह्यात : ६२ रुग्णांची नोंद : वाडीत संशयित रुग्णाचा मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : डेंग्यूसदृश तापाने नागपूर जिल्हा फणफणला आहे. सहा जिल्ह्यांच्या नागपूर विभागात आतापर्यंत १२८ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले असून सर्वाधिक नोंद नागपूर जिल्ह्यात झाली आहे. यात महानगरपालिकेच्या हद्दीत ४६ तर नागपूर ग्रामीण भागात १६ असे एकूण ६२ रुग्ण आढळून आले आहेत. विशेष म्हणजे, १७ आॅगस्ट रोजी खात येथील १७ वर्षीय मुलीचा तर २० आॅगस्ट रोजी वाडी येथील ५७ वर्षीय इसमाचा डेंग्यू संशयित म्हणून मृत्यू झाल्याने डेंग्यूला घेऊन भीतीचे वातावरण आहे.
एकीकडे सण उत्सवाचे वातावरण असताना दुसरीकडे डेंग्यू गंभीर रूप धारण करीत आहे. डेंग्यू डासांची पैदास पाच एमएल पाण्यातही होत असल्याने जवळजवळ अर्धा जिल्हा तापाने फणफणला आहे. वस्त्यावस्त्यांमध्ये डेंग्यूचे रुग्ण आढळून येत आहेत. शासकीयसह खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या डेंग्यू संशयित रुग्णांच्या संख्येत वाढच होत असल्याचे चित्र आहे. डेंग्यूवर नियंत्रण मिळविण्यासाठी नगर परिषद व महापालिकेच्या हिवताप व हत्तीरोग विभागाच्यावतीने घराघरांची झाडाझडती घेतली जात आहे. परंतु अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे विभागाचे प्रयत्न तोकडे पडत असल्याचे वास्तव आहे. यातच वारंवार तपासणीत एकाच घरात डेंग्यूच्या अळ्या आढळून येत असताना त्यावर दंडात्मक कारवाई करण्याचे अधिकार या विभागाला नाही. परिणामी, जनजागृतीच्या भरवशावर हा विभाग डेंग्यूवर मात करण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहे.
शहरात ४६ तर ग्रामीणमध्ये १६ रुग्ण
महानगरपालिकेच्या हिवताप व हत्तीरोग विभागाकडे एकट्या आॅगस्ट महिन्यात शहरात २४ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत, तर जानेवारी ते आतापर्यंत रुग्णांची संख्या ४६वर पोहचली आहे. नागपूर ग्रामीणमध्येही डेंग्यूचे रुग्ण वाढले आहेत. आतापर्यंत १६ रुग्णांची नोंद झाली आहे.
नागपूर ग्रामीणमध्ये दोन संशयिताचा मृत्यू
नागपूर ग्रामीणमध्ये खात येथील रहिवासी प्राचिता चंद्रभान आंबिलडुके (१७) या मुलीचा १७ आॅगस्ट रोजी मेडिकलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर दत्तवाडी स्मृतीनगर येथील रहिवासी बालाजी फकिरा भुडे (५७) यांचा मृत्यू २० आॅगस्ट रोजी झाला. भुडे कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, एका खासगी डॉक्टरांकडून उपचार घेतल्यानंतर डिगडोह येथील लता मंगेशकर हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. यात सोमवारी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हॉस्पिटलमध्ये केलेल्या तपासणीत डेंग्यू झाल्याचे निदान झाले होते.
नागपूर विभागांतर्गत येणाऱ्या नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा व गोंदिया या सहा जिल्ह्यातील ९९२ डेंग्यू संशयित रुग्णांची रक्ताची तपासणी केली असता आतापर्यंत १२८ रुग्ण पॉझिटिव्ह आले. यात नागपूर जिल्ह्यात ६२, वर्धेत ३१, चंद्रपुरात ३३, गडचिरोलीत दोन रुग्ण तर भंडारा व गोंदिया जिल्ह्यात एकही रुग्ण आढळून आलेला नाही.
आरोग्य विभागाकडे प्रभावशाली यंत्रणाच नाही
डेंग्यू डासावर नियंत्रण मिळविण्याची जबाबदारी आरोग्य विभागासोबतच नागरिकांची आहे. महत्त्वाचे म्हणजे प्रशासनाकडे डासांशी मुकाबला करण्याची प्रभावशाली यंत्रणा नाही. त्यामुळे अत्यंत संवेदनशील व नाजूक आरोग्याच्या बाबतीत शहराला डेंग्यूसारख्या धोक्याच्या मिठीत ढकलले जात आहे.
शहरातील गेल्या चार वर्षांतील डेंग्यू स्थिती
वर्ष                             रुग्ण
२०१४                         ६०१
२०१५                         २३०
२०१६                        १९५
२०१७                        २००

रोज सात-आठ रुग्ण
डेंग्यूवर स्पष्ट उपचार किंवा अ‍ॅण्टीबायोटिक किंवा अ‍ॅण्टीव्हायरल औषध नाही. आजाराच्या लक्षणावरून उपचार केला जातो. सध्या रोज सात-आठ रुग्ण उपचारासाठी येत आहेत. काही रुग्णांना दाखल करून उपचार करावा लागत आहे. डेंग्यूला कारणीभूत असलेला ‘एडीस’ डास हा कूलर, पाण्याच्या टाक्या, ड्रम, कुंड्या, डबके व पावसाचे किंवा स्वच्छ पाणी जिथे जमा राहील अशा ठिकाणी लवकर फैलतो. यामुळे प्रत्येकाने पाणी जमा होणार नाही याची काळजी घ्यायला हवी. मनपाकडूनही डबक्यांवर कीटकनाशक फवारणी करायला हवी.
डॉ. पिनाक दंदे

डेंग्यू नियंत्रणासाठी लोकसहभाग आवश्यक
डेंग्यूचा डासावर नियंत्रण मिळविण्यासाठी लोक सहभागाची आवश्यकता आहे. प्रत्येन नागरिकाने घरात जमा होणाऱ्या पाण्याची, कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावली तर यावर नियंत्रण मिळविणे सहज शक्य आहे.
डॉ. प्रशांत जगताप

लहान मुलांमध्ये वाढतोय डेंग्यू
डेंग्यूचा डास दिवसा चावतो. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये डेंग्यूचे रुग्ण दिसून येत आहे. शालेय प्रशासनाने याला गंभीरतेने घेत साचलेल्या पाण्यावर फवारणी करणे, विद्यार्थ्यांना फूल बाह्यांचे शर्ट व पँट घालण्याच्या सूचना करणे, वर्गात विशेष उपाययोजना करणे आवश्यक आहे.
डॉ. अविनाश गावंडे

Web Title: 128 patients of Dengue in Nagpur division

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.