पेंचमध्ये आढळल्या फुलपाखरांच्या १२८ प्रजाती; मार्चमध्ये होणार तीन दिवस सर्वेक्षण
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2023 03:32 PM2023-02-22T15:32:58+5:302023-02-22T15:33:45+5:30
या मोहिमेतील सहभागासाठी संबंधितांना २५ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करता येणार
नागपूर : पेंच व्याघ्र प्रकल्पामध्ये फुलपाखरांच्या १२८ प्रजातींची नोंद सहाय्यक वनसंरक्षक अतुल देवकर यांच्या अध्ययनातून झाली आहे. यावर अद्याप शिक्कामोर्तब झाले नसले तरी लवकरच त्याची रितसर नोंद घेतली जाणार आहे. नागरिक आणि संशोधकांचा समावेश असलेले फुलपाखरू सर्वेक्षण येत्या मार्च महिन्यात पेंचमध्ये होणार आहे. त्यामुळे या संशोधनाला महत्व येणार आहे.
मागील पाच ते सहा वर्षांपासून अतुल देवकर यांचे फुलपाखरांवर अध्ययन सुरू आहे. यापूर्वी त्यांनी गडचिरोली जिल्ह्यात कार्यरत असताना कमलापूर येथील ३० फुलपाखरांच्या नव्या प्रजातींची नोंद घेतली होती.
पेंच व्याघ्र प्रकल्पामध्ये १० ते १२ मार्च या कालावधीत पहिल्या फुलपाखरू सर्वेक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. यात अध्ययनाची आवड असलेले २७ वनरक्षक आणि अभ्यासक सहभागी होणार आहेत. टिन्सा इकॉलॉजिकल सोल्युशन्सच्या सहकार्याने ही मोहीम होणार आहे. त्यातून पेंचमधील विविध भागांत असलेल्या फुलपाखरांच्या प्रजातींची नोंद कमी कालावधीत घेता येणे शक्य होणार आहे. या मोहिमेतील सहभागासाठी संबंधितांना २५ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करता येणार आहे.
पेंचमधील विशेष नोंद
प्रदूषणरहीत जागेत आढळणाऱ्या फुलपाखरांच्या प्रजातींची विशेष नोंद अतूल देवकर यांच्या यापूर्वीच्या अध्ययनातून झाली आहे. कॉमन बँडेड पिकॉक, ब्ल्यू मॉर्मान, कॉमन इमिग्रंट, कॉमन माईम आदी फुलपाखरांच्या प्रजातींचा यात समावेश आहे. फुलपाखरू संशोधक डॉ. आशिष टिपले यांच्या मागदर्शनाखाली हे अध्ययन केले जात आहे.