मोबाईलसाठी रागावल्यामुळे बारावीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या; लहान भावाला खेळण्यासाठी पाठवले अन्...
By दयानंद पाईकराव | Published: November 25, 2023 07:48 PM2023-11-25T19:48:38+5:302023-11-25T19:49:04+5:30
मोबाईलसाठी आईवडिल रागावल्यामुळे बारावीला शिकणाऱ्या एका मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली.
नागपूर: मोबाईलसाठी आईवडिल रागावल्यामुळे बारावीला शिकणाऱ्या एका मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना नंदनवन पोलिस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास घडली. खुशी दिलीप पनेकर (वय १७, रा. गल्ली नं. २ शास्त्रीनगर) असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे. संचिता १२ वी विज्ञान शाखेला शिकत होती. तिच्या कुटुंबात आई-वडिल आणि लहान भाऊ आहे. तिचे आईवडिल मजुरीचे काम करतात.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संचिता मोबाईलवर बराच वेळ घालवित असल्यामुळे तिच्या आईवडिलांनी तिला रागावले होते. त्यामुळे रागाच्या भरात शुक्रवारी सकाळी आईवडिल कामावर गेल्यानंतर संचिताने आपल्या लहान भावाला खेळण्यासाठी बाहेर पाठविले. त्यानंतर आतुन दरवाजा लाऊन सिलींग फॅनला ओढणी बांधून गळफास घेतला. ती गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसल्यामुळे तिच्या नातेवाईकांनी तिला खाली उतरवून उपचारासाठी मेडिकलमध्ये नेले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी मिळालेल्या वैद्यकीय सुचनेवरून नंदनवन पोलिस ठाण्याचे हवालदार प्रशांत मिसाळ यांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरु केला आहे.