नागपूर जिल्ह्यात नुकसान भरपाईपोटी पहिल्या टप्प्यात १३ कोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2019 12:33 AM2019-11-21T00:33:18+5:302019-11-21T00:37:28+5:30
राज्यपालांनी राज्याला नुकसानभरपाई मंजूर केली आहे. याच्या पहिल्या हप्त्यापोटी जिल्ह्याला १३ कोटी रुपये प्राप्त झाले असून, त्याचे लवकरच शेतकऱ्यांना वितरण होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जिल्ह्यात ऑक्टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. एकंदरीत जिल्ह्यात ५४ हजार २०२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून, यामध्ये सर्वाधिक ३४ हजार ९६२ हेक्टरवरचे नुकसान हे कापसाचे आहे. जिल्हा प्रशासनाकडून शेतीचे पंचनामे करून शासनाकडे नुकसानभरपाईसाठी ४६ कोटी ८५ लक्ष रुपयाचा प्रस्ताव पाठविण्यात आला. त्यानुसार राज्यपालांनी राज्याला नुकसानभरपाई मंजूर केली आहे. याच्या पहिल्या हप्त्यापोटी जिल्ह्याला १३ कोटी रुपये प्राप्त झाले असून, त्याचे लवकरच शेतकऱ्यांना वितरण होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिली.
अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या तब्बल ५४ हजार २०२ हेक्टरवरील कापूस, धान, सोयाबीन आदी पिकांचे नुकसान झाले. कृषी, महसूल विभागाने पंचनामे केले. प्रशासकीय पातळीवरील पंचनाम्याची प्रक्रिया पूर्ण करून जिल्हा प्रशासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई म्हणून ४६ कोटी ८५ लक्ष ४८ हजार रुपये मदतीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला. त्यानुसार नुकसानभरपाईच्या पहिल्या हप्त्यापोटी जिल्ह्याला १३ कोटीचा निधी प्राप्त झाला आहे. हा निधी शेतकऱ्यांना वितरित केल्यानंतर पुन्हा राज्य शासनाकडे निधीची मागणी करण्यात येणार आहे. एकूण ४८ कोटीचा निधी हा तीन टप्प्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
ऑगस्ट-सप्टेंबरच्या अतिवृष्टीची नुकसानभरपाई शिल्लक!
गत ऑगस्ट व सप्टेंबर या पावसाळ्यांच्या दिवसामध्ये जिल्ह्यात अतिवृष्टी झाली होती. यामुळे जिल्ह्यातील २० हजारावरील शेतकऱ्यांच्या ३० हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. त्या नुकसानभरपाईचा निधी अद्याप राज्य शासनाकडून जिल्हा प्रशासनाला प्राप्त झालेला नाही.
केंद्रीय पथक घेणार विदर्भातील नुकसानीचा आढावा
राज्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतीतील शेतपिकांचे नुकसान पाहण्यासाठी पाचही विभागामध्ये केंद्रीय पथक तीन दिवसीय पाहणी दौरा करून आढावा घेणार आहे.
यामध्ये नागपूर आणि अमरावती विभागाचा नुकसान पाहणी दौरा कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाचे संचालक डॉ. आर. पी. सिंह हे शुक्रवार २२ ते २४ नोव्हेंबरदरम्यान आढावा घेणार आहेत. हे केंद्रीय पथक विभागातील सर्व जिल्ह्यातील अवेळी पावसामुळे नुकसान झालेल्या भागास भेट देणार आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांच्याकडून प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.