आठवडाभरात १३ जणांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:08 AM2021-04-14T04:08:52+5:302021-04-14T04:08:52+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क उमरेड : चनाेडा (ता. उमरेड) येथे मागील आठ ते १० दिवसांत १३ जणांचा मृत्यू झाल्याचे ग्रामस्थांनी ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
उमरेड : चनाेडा (ता. उमरेड) येथे मागील आठ ते १० दिवसांत १३ जणांचा मृत्यू झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण मात्र स्पष्ट झाले नाही. येथील नागरिकांचे एकापाठाेपाठ एक मृत्यू हाेत असल्याने येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे अत्यावश्यक असल्याचेही स्थानिकांनी सांगितले.
मागील दाेन दिवसांत चनाेडा येथील तिघांचा मृत्यू झाला. गावातील मृत्यूदर नेमका कशामुळे वाढत आहे, हे अद्याप स्पष्ट झाले नाही; पण मृत्यूदर असाच वाढत राहिल्यास परिस्थिती सावरणे कठीण जाईल. ही बाब ग्रामस्थांच्या चिंतेत भर टाकणारी आहे, असेही चनाेडा येथील सरपंच चेतन चाैधरी यांनी सांगितले. आपण या प्रकाराबाबत प्रशासनाला व वरिष्ठ अधिकाऱ्यांना वारंवार माहिती दिली. प्रशासकीय यंंत्रणेने गावात काेराेना चाचणी शिबिराचे आयाेजन करून नागरिकांच्या टेस्ट करवून घेतल्या, असेही चेतन चाैधरी यांनी सांगितले.
गावात काेराेना संक्रमित रुग्ण आहेत. काहींना घरी विलगीकरण कक्षात सुविधांअभावी राहणे शक्य नसल्याने गावातील प्राथमिक शाळेत विलगीकरण कक्षाची निर्मिती केली आहे, अशी माहिती सरपंच चेतन चाैधरी यांनी दिली. दुसरीकडे, आपण काेराेना टेस्ट करूनही आपले रिपाेर्ट अद्याप प्राप्त झाले नाहीत, असेही अनेक ग्रामस्थांनी सांगितले. सामाजिक कार्यकर्ते विलास झोडापे यांनी या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधले असून, चनाेडावासीयांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात माहिती घेण्यासाठी तालुका आपत्ती व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तथा तहसीलदार प्रमोद कदम यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही.