स्मार्ट व्हिलेजसाठी १३ ग्रामपंचायतीत स्पर्धा
By admin | Published: April 25, 2017 01:48 AM2017-04-25T01:48:37+5:302017-04-25T01:48:37+5:30
गावागावात विकासाच्या नावावर स्पर्धा निर्माण करून, जास्तीत जास्त गाव कसे स्मार्ट होईल, यासाठी राज्य शासनाने स्मार्ट व्हिलेज योजना राबविली आहे.
४० लाखांचे बक्षीस : ग्रामपंचायतीच्या गुणवत्तेवर मिळणार गुण
नागपूर : गावागावात विकासाच्या नावावर स्पर्धा निर्माण करून, जास्तीत जास्त गाव कसे स्मार्ट होईल, यासाठी राज्य शासनाने स्मार्ट व्हिलेज योजना राबविली आहे. यासाठी तालुकास्तरावर एका ग्रामपंचायतीची स्मार्ट व्हिलेज म्हणून निवड करण्यात आली असून, जिल्ह्यातील १३ तालुक्यातील १३ ग्रामपंचायती स्मार्ट व्हिलेजच्या स्पर्धेत उतरल्या आहेत.
यातून पहिल्या क्रमांकावर निवड होणाऱ्या ग्रामपंचायतीला ४० लाख रुपयांचे बक्षीस मिळणार असल्याची माहिती जि.प. अध्यक्ष निशा सावरकर यांनी दिली. केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटीच्या धर्तीवर राज्य सरकारने स्मार्ट व्हिलेज संकल्पना राबविली असून, यामुळे ग्रामपंचायतींचे सक्षमीकरण होणार आहे. गावात आरोग्य व्यवस्था, स्वच्छता, अपारंपरिक ऊर्जेचा वापर, ग्रामपंचायतींचे दायित्व, शिक्षण सुविधा आदीवर भर दिला जाणार आहे. ग्रामविकास खात्यातील अनेक योजना एकत्र करत सरकारने ही योजना सुरू केली आहे. गावांचा विकास झाल्यास शहरे स्मार्ट होतील आणि त्यामुळे शहरांवरचा ताण कमी होण्यास मदत होईल, या उद्देशाने शासनाने ही योजना सुरू केली आहे. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या संकल्पनेतून स्मार्ट ग्राम योजनेची आखणी करण्यात आली आहे.
या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील १३ तालुक्यातून १३ ग्रा.पं.ची तालुकास्तरावर निवड करण्यात आली असून, प्रत्येक ग्रा.पं.ला १० लाख रुपये रोख पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. तालुकास्तरावर निवड झालेल्या ग्रामपंचायतीपैकी एका ग्रामपंचायतीची जिल्हास्तरावर निवड होणार आहे. यासाठी जिल्हास्तरावर जि.प. सीईओंच्या अध्यक्षतेखाली समिती तयार करण्यात आली आहे. ही समिती स्मार्ट ग्राम योजनेमध्ये सेवा हमी कायद्याची अंमलबजावणी, अपारंपरिक ऊर्जा स्रोतांचा वापर, पर्यावरण रक्षण, वनीकरण, डिजिटलायजेशन, ग्रामपंचायतीचे संगणकीकरण, स्वच्छता, जलसंधारण, कुपोषणमुक्ती, आरोग्य अशा विविध घटकांच्या संपूर्ण अंमलबजावणीवर लक्ष केंद्रित करणार आहे. त्यानुसार गुण ठरविण्यात आले आहेत.
ज्या ग्रामपंचायतीला सर्वाधिक गुण मिळतील ती ग्रामपंचायत ‘स्मार्ट व्हिलेज’ म्हणून घोषित करण्यात येणार आहे. १ मे ला तालुकास्तरावर निवड झालेल्या व जिल्हास्तरावर निवड झालेल्या ग्रामपंचायतीला बक्षीस वितरण होणार आहे. (प्रतिनिधी)
तालुकास्तरावर निवड झालेल्या ग्रामपंचायती
कामठी महालगाव
नागपूर आलागोंदी
हिंगणा वागधरा
कळमेश्वर खापरी
भिवापूर चिंचाळा
काटोल बिहालगोंदी
मौदा धानला
उमरेड नवेगाव (साधू)
रामटेक खैरी बिजेवाडा
नरखेड खेडी गो.गो.
कुही चितापूर
पारशिवनी दहेगाव (जोशी)
सावनेर भानेगाव