१३ लाखाच्या घरफोडीचा सात दिवसात छडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:13 AM2021-02-17T04:13:23+5:302021-02-17T04:13:23+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर - हुडकेश्वरच्या महालक्ष्मीनगरात धाडसी घरफोडी करून २८ तोळे सोन्यासह १३ लाखाचा ऐवज लंपास करणाऱ्या एका ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - हुडकेश्वरच्या महालक्ष्मीनगरात धाडसी घरफोडी करून २८ तोळे सोन्यासह १३ लाखाचा ऐवज लंपास करणाऱ्या एका टोळीच्या हुडकेश्वर पोलिसांनी मुसक्या बांधल्या. या टोळीतील तिघे आणि त्यांच्याकडून चोरीचे सोने घेऊन त्याची लगदी (बिस्कीट) तयार करणाऱ्या सराफा व्यापाऱ्याच्या पत्नीला पोलिसांनी अटक केली. संमेत संतोष दाभणे (वय २०), अंकित साहेबराव येले (वय २०), प्रदीप रामप्रसाद हातागडे (वय ३४) आणि सराफा महिला अशी आरोपींची नावे आहेत.
हुडकेश्वरच्या महालक्ष्मीनगरात राहणारे ज्ञानेश्वर हरिश्चंद्र पराते (वय १९) यांच्या दाराचे कुलूप तोडून चोरट्यांनी ९ फेब्रुवारीला २८ तोळे सोने आणि रोख १० हजार असा एकूण १२ लाख ६९ हजाराचा ऐवज लंपास केला होता. पराते यांच्या तक्रारीवरून घरफोडीचा गुन्हा दाखल करून ठाणेदार प्रताप भोसले यांच्या नेतृत्वात एपीआय स्वप्निल भुजबळ, हवालदार दीपक मोरे, राजेश मोते, राजेश धोपटे आणि प्रफुल्ल वाघमारे यांनी तपासाची चक्रे फिरविली. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे मिळालेला धागा धरून पोलिसांनी आरोपी संमेत, अंकित आणि प्रदीपच्या मुसक्या बांधल्या. त्यांनी घरफोडीची कबुली देतानाच ओम ज्वेलर्सच्या संचालकाच्या पत्नीला चोरीचे दागिने विकल्याची माहिती पोलिसांना दिली. त्यामुळे पोलिसांनी तिलाही अटक केली. त्यांच्याकडून पोलिसांनी १२ लाख ६९ हजाराचे सोन्याच्या दागिन्याची लगदी तसेच गुन्ह्यासाठी वापरलेली कार असा एकूण१५ लाख ६९ हजाराचा मुद्देमाल जप्त केला.
----
आणखी गुन्ह्यांचा उलगडा
या टोळीकडून आणखी काही गुन्हे उजेडात येण्याची शक्यता असून, पोलीस त्या अनुषंगानेही तपास करीत आहेत. दरम्यान, अवघ्या सात दिवसात धाडसी घरफोडीच्या गुन्ह्याचा छडा लावण्याची प्रशंसनीय कामगिरी हुडकेश्वर पोलिसांनी बजावल्यामुळे वरिष्ठांकडून त्यांचे काैतुक केले जात आहे.
---