CoronaVirus in Nagpur : नागपुरात ‘एसआरपीएफ’च्या सहा जवानांसह १३ पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2020 11:28 PM2020-05-20T23:28:37+5:302020-05-20T23:35:15+5:30
पाच महिन्याचा चिमुकला व एसआरपीएफच्या सहा जवानासह १३ रुग्ण बुधवारी पॉझिटिव्ह आले. नागपुरात पहिल्यांदाच कमी वयाच्या रुग्णाची नोंद झाली. आईवडिलांचे नमुने निगेटिव्ह तर चिमुकल्याचा नमुना पॉझिटिव्ह आला. विशेष म्हणजे, नागपूर ग्रामीणमध्ये कन्हान, कामठीसोबतच आता कोंढाळीनजीकच्या दुधाळातही कोरोनाचा शिरकाव झाल्याने या भागातील आरोग्य विभागाचे पथक सतर्क झाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पाच महिन्याचा चिमुकला व एसआरपीएफच्या सहा जवानासह १३ रुग्ण बुधवारी पॉझिटिव्ह आले. नागपुरात पहिल्यांदाच कमी वयाच्या रुग्णाची नोंद झाली. आईवडिलांचे नमुने निगेटिव्ह तर चिमुकल्याचा नमुना पॉझिटिव्ह आला. विशेष म्हणजे, नागपूर ग्रामीणमध्ये कन्हान, कामठीसोबतच आता कोंढाळीनजीकच्या दुधाळातही कोरोनाचा शिरकाव झाल्याने या भागातील आरोग्य विभागाचे पथक सतर्क झाले आहे.
नागपुरात एकूण रुग्णांची संख्या ३८७ झाली असून आज पुन्हा १२ रुग्ण बरे होऊन घरी परतले. इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेयो) प्रयोगशाळेत तपासण्यात आलेल्या नमुन्यांमध्ये सहा रुग्णांचे नमुने पॉझिटिव्ह आले. यात एक गड्डीगोदाम तर पाच गोळीबार चौकातील रुग्ण आहेत. यातील एका कुटुंबातील पाच महिन्याचा चिमुकला पॉझिटिव्ह तर त्याचे आईवडील निगेटिव्ह आल्याने गोंधळ उडाला त्यांनी तपासण्यात आलेल्या नमुन्यावर संशय व्यक्त केला. परंतु आरोग्य विभागाच्या चमूने सखोल माहिती घेतली असता त्यांच्या घरी काम करणाऱ्या बाईकडून चिमुकल्याला लागण झाल्याचे समोर आल्याने तणाव निवळला. उर्वरित पाच रुग्णांमध्ये घरकाम काम करणाºया ३२ वर्षीय महिलेसह ७ वर्षाचा मुलगा, ५०, ६५ व ७५ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
सहाही जवान आरपीटीएसमध्ये क्वारंटाईन
नागपुरात पहिल्यांदाच १६ मे रोजी तीन पोलीस पॉझिटिव्ह आल्याने पोलीस विभागात खळबळ उडाली होती. बाधित पोलिसांच्या कुटुंबातील व संपर्कात आलेल्या पोलिसांचे नमुने तपासले असता ३०वर नमुने निगेटिव्ह आले. यामुळे पोलीस प्रशासनाने सुटकेचा नि:श्वास टाकला होता, परंतु आरपीटीएसमध्ये क्वारंटाईन असलेल्या एसआरपीएफ जवानांसह इतरांचे ३० वर नमुने नीरीच्या प्रयोगशाळेत आज तपासले असता यातील सहा जवानांचे नमुने पॉझिटिव्ह आले.
बालिकेला नागपुरात लागण
कोंढाळीनजीक दुधाळा गावातील नऊ वर्षीय बालिका आपल्या कुटुंबासह नागपुरात मामाकडे आली होती. १५ तारखेला हे कुटुंब आपल्या गावाला आले. नागपूरहून आल्याने तेथील लोकांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणी करण्यास सांगितले. कुटुंबात कुणाला लक्षणे नसल्याने डॉक्टरांनी हातावर होम क्वारंटाईनचा स्टॅम्प मारला. १६ तारखेला संबंधित डॉक्टरला हे कुटुंब कन्टेन्मेंट एरियामध्ये होते हे कळल्यावर त्यांनी त्याच दिवशी आमदार निवासात क्वारंटाईन होण्यास सांगितले. आज त्यांचे नमुने तपासले असता नऊ वर्षीय बालिकेचे नमुने पॉझिटिव्ह आले. आई-वडील व तिच्या भाऊ व बहिणीचा अहवाल उद्या प्राप्त होणार असल्याची माहिती आहे.
मेडिकलमधून ११ तर मेयोमधून १ रुग्ण कोरोनामुक्त
मेयोमधून १ तर मेडिकलमधून ११ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. यात सतरंजीपुरा येथील ५५वर्षीय पुरुष तर मोमीनपुरा येथील १०, ३० व ३५, ६० व ६२ वर्षीय महिला व ९, २०, २२, ३०,६५ वर्षीय पुरुष आहे. एक ६१ वर्षीय पुरुष अमरावती येथील आहे.
कोरोनाची आजची स्थिती
दैनिक संशयित १५३
दैनिक तपासणी नमुने ५१९
दैनिक निगेटिव्ह नमुने ५०६
नागपुरातील पॉझिटिव्ह नमुने ३८७
नागपुरातील मृत्यू ७
डिस्चार्ज केलेले पॉझिटिव्ह रुग्ण ३०३
डिस्चार्ज केलेले संशयित रुग्ण २२२७
क्वारंटाईन कक्षात एकूण संशयित २०१४
पीडित-३८७-दुरुस्त-३०३-मृत्यू-७