विना फिटनेस धावणाऱ्या १३ स्कूल बसेस जप्त
By सुमेध वाघमार | Published: July 10, 2023 06:38 PM2023-07-10T18:38:15+5:302023-07-10T18:38:25+5:30
२३ ऑटोरिक्षांवर कारवाई : आरटीओ, वाहतूक पोलिसांची संयुक्त मोहिम
नागपूर : शहर व ग्रामीण भागातील तब्बल ७६२ स्कूल बस व स्कू ल व्हॅन विना फिटनेस रस्त्यावर धावत असल्याने विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात आला आहे. सोमवारी प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) व वाहतूक पोलिसाच्या संयुक्त तपासणीत ३६ वाहनांवर कारवाई केली. यात १३ स्कूल बसेस जप्त केल्या.
पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी स्कूल बस सुरक्षितता समितीची बैठक पार पडली. यावेळी शालेय विद्यार्थ्याच्या सुरक्षित वाहतुकीचा आढावा घेण्यात आला. शहर व ग्रामीण भागातील ३,७५७ स्कूल बस व व्हॅनपैकी ७६२ वाहनांना योग्यता प्रमाणपत्र (फिटनेस सर्टिफिकेट) नसल्याचे पुढे आले. याची गंभीर दखल घेत त्यांनी सोमवारपासून संयुक्त मोहिम राबविण्याचा सूचना केल्या. त्यानुसार, आज शहरात विविध ठिकाणी स्कूल बस, खासगी बस व आॅटोरिक्षाची तपासणी करण्यात आली. दिवसभरात १३ बसेस व २३ आॅटोरिक्षा दोषी आढळून आल्या. या सर्व वाहनांना अडकवून ठेवण्यात आले. ज्यांनी दंड भरला त्यांना नंतर सोडून देण्यात आले.
-विद्यार्थ्यांच्या जीवाशी कुठलिही तडजोड नाही-भूयार
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रविंद्र भूयार यांनी सांगितले, पोलीस आयुक्तांच्या सूचनेनुसार आजपासून स्कूल बस व इतरही वाहनांची तपासणी मोहिम हाती घेण्यात आली. नियमांचे उल्लंघन करणाºया विशेषत: स्कूल बसमुळे विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात येईल, कशी कुठलिही तडजोड केली जाणार नाही. कारवाईच्या या मोहिमेत शिथीलताही येणार नाही. या कारवाईच्या दरम्यान विद्यार्थी अडचणीत येणार नाही, याची काळजी पालक व शाळांनी घ्यावी. त्यांनी फिटनेस प्रमाणपत्र असलेल्या वाहनातूनच विद्यार्थ्यांना शाळेत पाठवावे, असे आवाहनही त्यांनी केले.