विनाफिटनेस धावणाऱ्या १३ स्कूल बसेस जप्त; आरटीओ, वाहतूक पोलिसांची संयुक्त मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2023 07:11 PM2023-07-10T19:11:35+5:302023-07-10T19:12:10+5:30
Nagpur News सोमवारी प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) व वाहतूक पोलिसाच्या संयुक्त तपासणीत ३६ वाहनांवर कारवाई केली. यात १३ स्कूल बसेस जप्त केल्या.
नागपूर : शहर व ग्रामीण भागातील तब्बल ७६२ स्कूल बस व स्कूल व्हॅन विनाफिटनेस रस्त्यावर धावत असल्याने विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात आला आहे. सोमवारी प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) व वाहतूक पोलिसाच्या संयुक्त तपासणीत ३६ वाहनांवर कारवाई केली. यात १३ स्कूल बसेस जप्त केल्या.
पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी स्कूल बस सुरक्षितता समितीची बैठक पार पडली. यावेळी शालेय विद्यार्थ्याच्या सुरक्षित वाहतुकीचा आढावा घेण्यात आला. शहर व ग्रामीण भागातील ३७५७ स्कूल बस व व्हॅनपैकी ७६२ वाहनांना योग्यता प्रमाणपत्र (फिटनेस सर्टिफिकेट) नसल्याचे पुढे आले. याची गंभीर दखल घेत त्यांनी सोमवारपासून संयुक्त मोहीम राबविण्याचा सूचना केल्या होत्या. त्यानुसार, आज शहरात विविध ठिकाणी स्कूल बस, खासगी बस व ऑटोरिक्षांची तपासणी करण्यात आली. दिवसभरात १३ बसेस व २३ ऑटोरिक्षा दोषी आढळून आल्या. या सर्व वाहनांना अडकवून ठेवण्यात आले. ज्यांनी दंड भरला त्यांना नंतर सोडून देण्यात आले.
-विद्यार्थ्यांच्या जिवाशी कुठलीही तडजोड नाही : भुयार
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रवींद्र भुयार यांनी सांगितले, पोलिस आयुक्तांच्या सूचनेनुसार आजपासून स्कूल बस व इतरही वाहनांची तपासणी मोहीम हाती घेण्यात आली. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या विशेषत: स्कूल बसमुळे विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात येईल, कशी कुठलीही तडजोड केली जाणार नाही. कारवाईच्या या मोहिमेत शिथिलताही येणार नाही. या कारवाईदरम्यान विद्यार्थी अडचणीत येणार नाही, याची काळजी पालक व शाळांनी घ्यावी. त्यांनी फिटनेस प्रमाणपत्र असलेल्या वाहनातूनच विद्यार्थ्यांना शाळेत पाठवावे, असे आवाहनही त्यांनी केले.